राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जयंत पाटील यांच्या सारख्या संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नेत्यालाही तोल सांभाळता आला नाही. परिणामी निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले.
विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याबद्दल संताप व्यक्त करण्याच्या नादात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी विधानसभा अध्यक्षांना (Maharashtra Assembly Winter Session) असंसदीय शब्द वापरला आणि संपूर्ण सभागृहात एकच गदारोळ झाला. सत्ताधारी बाकांवरून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. या गदारोळानंतर विधानसभेचे कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. मात्र, जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलबीत करण्यात आल्याने एका ज्येष्ठ नेत्याच्या अपरिपक्व वागणुकीचा नमुना नव्या पिढीसमोर सादर झाला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. ही मागणी अध्यक्षांनी फेटाळली. विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्हाला संधी दिली होती, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले. सत्ताधारी बाकावरून 14 जणांना बोलण्याची संधी दिली, त्यामुळे विरोधी बाकावरून अजुन एका सदस्यालातरी बोलण्याची संधी दिली पाहिजे अशी मागणी होऊ लागली. मात्र, विधानसभाध्यक्षांनी ही मागणी फेटाळून लावली. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी संताप व्यक्त करत तुम्ही असा निर्लज्जपणा करु नका, अशा शब्दांत संताप व्यक्त केला. जयंत पाटील यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी पक्षाचे सदस्य आक्रमक झाले. सत्ताधाऱ्यांकडून जयंत पाटील यांना एक वर्षासाठी निलंबित करण्याची मागणी झाली. सभागृहात गोंधळ वाढल्यानंतर कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.