रेशीमबागेत सोमवार पासून ‘रामस्मरण व्याख्यानमाले ‘चे आयोजन  रामनवरात्राच्या पर्वावर विशेष उपक्रम 

0

नागपूर ,दिनांक 25 मार्च
केशवनगर सांस्कृतिक सभा आणि कलासंगम सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ,दिनांक  २७ ,२८ आणि २९ मार्च या कालावधीत ‘ रामस्मरण व्याख्यानमालेचे’ आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष आहे . रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिराच्या परिसरातील महर्षी व्यास सभागृहात उपरोक्त कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यान होईल.

दिनांक २७ रोजी,कोल्हापूर येथील संत साहित्याचे अभ्यासक प्रशांत सरनाईक यांचे ‘ रामायणातील अध्यात्म ‘ या विषयावर व्याख्यान होईल .महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीपाद अपराजित हे प्रमुख अतिथी आहेत. दिनांक २८ रोजी,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांचे ‘ रामायणातील राजकारण ‘ या विषयावर व्याख्यान होईल . दैनिक तरुण भारतचे संपादक गजानन निमदेव प्रमुख अतिथी असतील . दिनांक २९ रोजी,नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी हे ‘हो है वही जो राम रची राखा ‘ या विषयावर विचार मांडतील . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हे प्रमुख अतिथी असतील. मूकबधीर विद्यालयाचेही विद्यार्थी या व्याख्यानमालेस उपस्थित राहणार असून त्यांचेसाठी स्वतंत्र दुभाषकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

उपरोक्त व्याख्यानमालेस रसिक आणि रामभक्त नागरिकांनी अगत्यपूर्वक आणि आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन प्रमुख संयोजक प्रकाश एदलाबादकर तसेच दोन्ही आयोजक  संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे .