“धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे…”, संजय राऊतांचा अजितदादांवर पलटवार!

0

मुंबईः अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील वाद आता विकोपाला गेलाय. “धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे”, या शब्दांत ठाकरे गटाचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी अजित पवारांवर तोप डागली. संजय राऊतांच्या या प्रतिक्रियेवर अजित पवारांनीही (Sanjay Raut reaction on Ajit Pawar) त्यांच्यावर पलटवार करीत ‘संजय राऊत बोलल्याने आमच्या अंगाला भोके पडत नाही’ असे सडेतोड उत्तर दिल्याने महाविकास आघाडीतील वादाला आयती फोडणी मिळाली आहे. वादाची सुरुवात काल संजय राऊत यांच्यापासून झाली होती. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत हे शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय शिरसाट यांचे नाव घेऊन तेथे थुंकले. त्यावरून अजित पवारांनी शनिवारी नागपुरात बोलताना राऊतांना खडेबोल ऐकवत “राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांनी तारतम्य ठेवून बोलावे”, असा सल्ला राऊतांना दिला होता.
राष्ट्रवादीच्या दोन दिवसांच्या बैठकीसाठी अजित पवार नागपुरात दाखल झाले आहे. अजित पवार यांना काल संजय राऊत यांनी केलेल्या थुंकण्याच्या प्रकारावर विचारण्यात आले असता त्यांनी तारतम्य बाळगण्याचा सल्ला दिला. यावर संजय राऊत यांना प्रतिक्रिया विचारली असता राऊतांनी “धरणात मुतण्यापेक्षा थुंकलेले बरे…”, या शब्दात अजित पवारांना सुनावले. राऊत पुढे म्हणाले की, “ज्याचे जळते, त्यालाच कळते. शिंदे गटाने केलेली गद्दारी आम्ही भोगतोय. त्या संतापातून ती कृती केली होती. एवढे भोगूनही आम्ही जमिनीवर ठाम उभे आहोत. आम्ही उगाच इकडे-तिकडे पळत नाही. एवढी संकट येऊनही पक्ष बदलण्याचा विचार आमच्या मनात येत नाही. उठसूठ भाजपबरोबर सूत जुळवण्याचा विचार आमच्या मनात येत नाही”, या शब्दात त्यांनी अजित पवारांचा समाचार घेतला. माझ्यामुळे अनेकांचे संतुलन बिघडले आहे. हे त्यांनी तरी मान्य करावे, असा टोला राऊतांनी यावेळी लगावला. त्यावर अजित पवारांना पुन्हा प्रतिक्रिया विचारण्यात आली असता अजित पवारांनी ‘संजय राऊत बोलल्याने आमच्या अंगाला भोके पडत नाही’ असे स्पष्ट सांगितले.