मुंबई : राज्यभरातील कर्मचारी व शिक्षक आजपासून बेमुदत संपावर गेले असून कर्मचाऱ्यांच्या संपाचा परिणाम शासकीय कार्यालयांमध्ये जाणवत आहे. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची अत्यल्प उपस्थिती असून काही ठिकाणी कार्यालय ओस पडल्याचे सांगितले जात (Statewide strike of state government Employees) आहे. दरम्यान, संपाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घातल्याने परिषदेचे कामकाज तहकूब झाले. आमदार कपिल पाटील, आमदार अभिजित वंजारी, आमदार विक्रम काळे यांच्यासह विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्रात संप सुरू असताना सरकारने बोलले पाहिजे, सरकार बोलत का नाही, असा प्रश्न विरोधी पक्ष नेते दावे यांनी उपस्थित केला.
जुनी पेन्शन योजनेवर चर्चा करण्याचा विरोधी पक्षांची मागणी सभापतींनी फेटाळून लावली. त्यानंतर सदस्य आक्रमक झाले. आमदार विक्रम काळे यांनी सभात्याग करण्याची भूमिका मांडली. पण त्यांनी लगेच सभात्याग केला नाही. त्यावर सभापतींनी त्यांना म्हणाल्या की, बरे झाले तुम्ही सभात्याग केला नाही. कारण सभागृहात राहूनच प्रश्न सुटू शकतात. जुनी पेन्शनचा तिढा सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण अद्याप त्यावर तोडगा निघाला नाही. आज राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. कारण राज्यातील कर्मचारी संपावर गेले आहेत. २५ तारखेनंतर येथे असलेले अधिकारी आणि कर्मचारीसुद्धा संपात सहभागी झालेले दिसतील. त्यामुळे चर्चा झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी आमदार अभिजित वंजारी यांनी लावून धरली. लगेच त्यांच्या साथीला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उभे झाले. ते म्हणाले, या विषयावर चर्चा होऊन गेलेली असली तरी आता महाराष्ट्रव्यापी संप सुरू झाला आहे. जनजीवन थांबले आहे. त्यामुळे सरकारची बोलण्याची तयारी असलीच पाहिजे, असे ते म्हणाले. दरम्यान, विरोधी पक्षाच्या आमदारांनी ‘एकच मिशन – जुनी पेन्शन…’च्या घोषणा दिल्या.