
अंत्यविधी अनुदानात वाढ
चंद्रपूर: चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांच्या निधनानंतर देण्यात येणाऱ्या ‘अंत्यविधी अनुदानात’ वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महासभेत घेण्यात आला आहे. प्रभाग क्र. ८ चे नगरसेवक श्री. अजय निळकंठराव बल्की यांनी या संदर्भात सातत्याने केलेल्या मागणीला आणि पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
वाढीव तरतुदीचा निर्णय:
शहरातील वाढती महागाई आणि अंत्यविधीसाठी लागणाऱ्या साहित्याचे वाढलेले दर पाहता, सध्या मिळणारे २,००० रुपये अनुदान अत्यंत अपुरे पडत होते. ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक अजय बाळकी यांनी हे अनुदान वाढवून ५,००० रुपये करण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. यावर महासभेत सविस्तर चर्चा होऊन अनुदानात १,००० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गरीब कुटुंबांना दिलासा:
नगरसेवक बल्की यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते की, अंत्यसंस्कारासाठी सध्या ५ ते ६ हजार रुपये खर्च येतो, ज्यामुळे शोककुल गरीब कुटुंबांवर आर्थिक ताण पडतो. शेजारील इतर महानगरपालिकांच्या धर्तीवर चंद्रपूर महानगरपालिकेनेही यात वाढ करावी, अशी त्यांची आग्रही भूमिका होती. या निर्णयामुळे आता गोरगरीब कुटुंबांना संकटकाळात अधिक आर्थिक आधार मिळणार आहे.
जनहिताचा हा निर्णय घेतल्याबद्दल अजय बल्की यांनी प्रशासनाचे आभार मानले असून, यामुळे अनेक गरजू कुटुंबांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.















