निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

0

      नवी दिल्ली : शिवसेना पक्ष व निवडणूक चिन्ह धनुष्यबाणाच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले (Supreme Court refused to stay ECI order on Shiv Sena) आहे. न्यायालयाने स्थगितीस नकार दिला असला तरी ठाकरे गटाला काही प्रमाणात दिलासा देखील मिळाला आहे. ठाकरे गटाच्या आमदारांवर दोन आठवडे कारवाई करता येणार नसून न्यायालयातील सुनावणीपर्यंत मशाल हे चिन्ह ठाकरे गटाकडे कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने याबाबत शिंदे गट आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून उत्तर मागवले आहेत. याप्रकरणावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाचा शिवसेना व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील दावा मान्य केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. ठाकरे गटाने या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला. तथापि, काही प्रमाणात ठाकरे गटाला दिलासा दिला आहे. पक्ष आणि चिन्हावरील आयोगाच्या निर्णयावर दोन आठवड्यानंतर सुनावणी होणार असून जोवर सुनावणी सुरु राहील, तोवर ठाकरे गटाकडे मशाल हे चिन्ह कायम असेल. त्याचप्रमाणे या सुनावणीपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या आधारावर शिंदे गटाने व्हीप काढल्यास तो ठाकरे गटाला लागू होणार नाही. ठाकरे गटाच्या आमदारांविरोधात व्हीप काढणार नाही तसेच त्यांना अपात्र केले जाणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाच्या वतीने न्यायालयात देण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा