गारठा वाढला, नागपूर ८ अंशावर

0
 नागपूर
ढगाळ वातावरण निवळल्यानंतरही विदर्भातील तापमानात सातत्याने घटच होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही हुडहुडी भरली असून, रविवारी नागपुरातील पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला असून, ही यंदाच्या मोसमातील सर्वात निच्चांकी नोंद झाली आहे. हवामान विभागाने आणखी दोन दिवस थंडीची लाट राहणार असल्याचा इशारा दिला असून, हवामान अभ्यासकांनुसार पुढील पाच दिवस पूर्व उत्तर विदर्भात थंडीची लाट राहणार आहे.

हवामान विभागाने रविवारी तुरळक भागात शीतलहरीचा इशारा दिला होता. हा अलर्ट सोमवारपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालय क्षेत्रात बर्फवृष्टी होणार आहे. तसेच सध्या वार्‍याची दिशा ही उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे. दक्षिण बंगालच्या खाडीत चक्रीवारे सक्रिय आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस मध्यप्रदेश आणि उत्तर पूर्व विदर्भात थंडीची लाट राहील, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे. सध्या विदर्भातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यात किमान तापमान १0 अं.से. च्या आसपास आहे. सर्वात कमी ६.८ अं.से. किमान तापमान गोंदियात नोंदविले गेले. गोंदिया आणि नागपूरपाठोपाठ वर्धा व गडचिरोली शहरात ९.४ तर ब्रम्हपुरी येथे ९.६ अं.से. किमान तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.

चंद्रपूरमध्ये किमान तापमान १0.२ अं.से आहे. अमरावती १0.४, यवतमाळ १0.७, अकोला ११ तर बुलडाणा येथे ११.४ अं.से. किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे. रविवार सुटीचा दिवस त्यात थंडी अधिक असल्याने दिवसाची सुरुवातच उशिराने झाली. चाकरमान्यांनी पांघरूणातच दडून राहणे पसंत केले. यामुळे ‘मॉर्निंग वॉक’ला येणार्‍यांची संख्या फारच कमी जाणवली. दुपारीही अनेकांनी घराबाहेर पडणे टाळून घरीच उन्हात बसण्याचा आनंद घेतला. रात्रीही मुख्य रस्त्यांवरील वाहनांची वर्दळ तुलनेने कमी होती. गेले दोन दिवस असेच वातावरण आहे. रात्री, पहाटेसह दिवसाही कडाका जाणवतो आहे. सायंकाळ होताच गारठा वाढू लागतो. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना शेकोट्या व उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे.