वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सुषमा अंधारेंमुळे वाढल्या ठाकरे गटाच्या अडचणी

0

मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ठाकरे गट अडचणीत आला आहे. सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करीत असलेल्या अंधारे यांनी काही दिवसांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज यांच्याबाबत टीकात्मक भाषा वापरली होती. त्यांनी प्रभु रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णावरही टीका केली (Sushma Andhare Controversial statements) होती. त्यांच्या या टीकेवर वारकरी सांप्रदायामध्ये संतापाची लाट पसरली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आलीय. प्रकरण इतक्यावर थांबलेले नाही तर सुषमा अंधारे ज्या पक्षात राहतील, त्या पक्षाला अजिबात मतदान न करण्याची शपथ काही वारकरी बांधवांनी घेतल्याचा व्हीडिओ देखील सोशल मिडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडिओ गंगासागर येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाकरे गटाच्या नेत्या असलेल्या सुषमा अंधारे या सातत्याने वादग्रस्त बोलत आहेत. आता त्यांनी हिंदु देवदेवतांसह संतांवरही आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे वारकरी बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. संत आणि देवतांचे विडंबन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने देहूरोड पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पुणे जिल्हा वारकरी साहित्य परिषदचे अध्यक्ष आणि संत तुकाराम महाराज यांचे वंशज प्रशांत महाराज मोरे, लक्ष्मण शेरकर, सविता गवते, विठ्ठल अण्णा भापकर, आनंदराव महाराज कदम, श्यामराव महाराज गायकवाड, आदींनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्राला शेकडो वर्षांची वारकरी परंपरा ही केवळ संतांच्या विचाराची द्योतक आहे. पण सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आळंदी येथील वारकरी मुलांनी सुषमा अंधारेंची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत निषेध व्यक्त केला. आळंदीचे युवा कीर्तनकार महेश अप्पा मडके पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. संतांबाबत बोलण्याआधी अभ्यास करण्याचा सल्लाही वारकऱ्यांनी अंधारे यांना दिला.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा