मूल-नागपूर दरम्यान अधिक बसफेऱ्या

0

 

विद्यार्थी, नागरिकांनी मानले सुधीर मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर,दि.२५: मूल-नागपूर-मूल या मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने तत्काळ बसफेऱ्यांची संख्या वाढविली आहे. यासंदर्भात राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे बसफेऱ्या वाढविण्याची मागणी केली होती.

मूल ते नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खुप मोठी आहे. याशिवाय कामानिमित्ताने मूल-नागपूर असा प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. बसेसची मोजकीच संख्या असल्याने या सर्वांची गैरसोय होत असल्याकडे ना. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांनी एसटी महामंडळाला तत्काळ बसफेऱ्या वाढविण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले,या आदेशानुसार एसटी महामंडळाने तत्काळ बसफेऱ्यांची संख्या वाढविली आहे.

एसटी महामंडळाने सकाळी सव्वा सहा वाजता, सकाळी साडे सात वाजता आणि सकाळी दहा वाजता मूलवरून नागपूरसाठी बस सोडण्यात येईल. याशिवाय दुपारी दोन वाजता, सायंकाळी साडे चार वाजता आणि सायंकाळी साडे पाच वाजता नागपूरवरून मूलसाठी बस सोडण्यात येणार आहे.मूल-नागपूर मार्गावर एसटी फेऱ्यांची संख्या वाढल्याने या भागातील नागरिक व विद्यार्थ्यांनी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे.