मुंबईः राजकीय वर्तुळात घमासान सुरुच असताना या गदारोळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुटीवर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी या सुटी जाहीर केलेली नाही. ते 24 ते 26 एप्रिल दरम्यान सुटीवर असल्याचे समजते. त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. त्यानंतर आपण सातारा जिल्ह्यातल्या आपल्या गावी जात असल्याचे यावेळी कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावर स्पष्टीकरण देताना (CM Shinde on Leave) सांगितले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे, असे कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे, असेही सामंत म्हणाले.
सध्या राजकीय वर्तुळात अनेक दावे प्रतिदावे सुरु आहे. मुख्यमंत्री बदलणार असल्याचा दावा संजय राऊतांनी यापूर्वीच केला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच अपेक्षित असून त्यात १६ आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्री शिंदे यांना जावे लागेल, अशीही चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सुटीवर गेल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.