नागपूरः “समृद्धी महामार्गासारखा महामार्ग खरोखरच तयार होऊ शकतो की नाही, यावर अनेकांना शंका होत्या. मात्र, एक व्यक्ती ज्याचा माझ्यावर पहिल्या दिवसापासून विश्वास होता आणि तो या संकल्पनेवर काम करत होता. त्या व्यक्तीचे नाव आहे त्यावेळचे माझ्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि आताचे आमचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे! ते पहिल्या दिवासापासून रस्त्यावर उतरून या महामार्गासाठी काम करत होते,” या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे पंतप्रधान मोदी यांच्या समक्षच कौतूक केले. या प्रसंगातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यातील ‘ट्युनिंग’ किती चांगले आहे, (Dy CM Devendra Fadnavis Praises CM Eknath Shinde) याची प्रचिती महाराष्ट्रातील जनतेला आली.
समृद्धी महामार्गाचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले, “आम्ही राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, पत्रकार, संपादकांना एकत्र आणून त्यांच्यासमोर समृद्धी महामार्गाची संकल्पना मांडली आणि त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर आम्ही या कामाची सुरुवात केली. सर्वात आधी भूमीअधिग्रहणाचा महत्त्वाचा विषय होता. त्यासाठी खूप पैशांची गरज होती, मात्र कोणतीही बँक देण्यास तयार नव्हती. महाराष्ट्र सरकारची काही अपत्ये अशी आहेत ज्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यात एमएमआरडीए, एमआयडीसी, सिडको या अपत्यांचा समावेश आहे. आम्ही त्यांना म्हटले की, सर्व पैसा मुंबईत कमावून मुंबईतच गुंतवणूक करू नका, आता त्या पैशाची विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही गुंतवणूक करा.
आम्ही त्यांच्याकडून पैसे उधार घेतले आणि सर्व जमिनींचे अधिग्रहण केले. केवळ ९ महिन्यांतच आम्ही ७०० किलो मीटर जमीनीचे अधिग्रहण केले. अधिग्रहणाला काहींचा विरोध होता काहींना विश्वास वाटत नव्हता. त्यामुळे आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः करारांवर स्वाक्षऱ्या केल्या” असा उल्लेखफडणवीसांनी यावेळी केला.