नागपूरः उपराजधानी नागपुरात विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी आयोजित संयुक्त कार्यक्रमातील भाषणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क मराठीतून (PM Narendra Modi in Nagpur) केली. मराठीतून भाषणाची सुरुवात करताना मोदी यांनी नागपूरचे आराध्य दैवत टेकडी गणेशाला वंदन करून विकासकामांचा उल्लेख केला. मराठीतून भाषणाला सुरुवात करत मोदी म्हणाले, “आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभकार्य करताना आपण पहिल्यांदा गणेश पूजन करतो. आज आपण नागपुरात आहोत तर टेकडीच्या गणपतीला माझं वंदन. ११ डिसेंबरचा आजचा दिवस संकष्ट चतुर्थीचा पवित्र दिवस आहे. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी ११ सिताऱ्यांचे महान नक्षत्राचा उदय होत आहे” असे ते म्हणाले. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांचा कडकटात करीत त्यांना दाद दिली.
पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत रविवारी तब्बल ११ प्रकल्पांचे लोकार्पण झाले. या प्रकल्पांचा उल्लेख मोदी यांनी अकरा तारे किंवा महाराष्ट्राच्या विकासाचे अकरा नक्षत्र असा करून महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदनही केले. देशात व राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्यामुळे विकासाची कामे किती वेगाने होऊ शकतात, याची प्रचिती या विकासकामांच्या लोकार्पणातून येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले. देशात पायाभूत सुविधांची कामे वेगाने होत असताना नुसताच पायाभूत विकास साध्य केला जात नसून त्याला मानवी संवेदनांचा स्पर्श देखील दिला जात असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.