नागपूर : अखेर विदर्भासह राज्याच्या सर्वांगीण विकास,समृद्धीचे दालन उघडणाऱ्या बहुप्रतीक्षित समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपुरात शानदार सोहळ्यात करण्यात आले. विशेष म्हणजे स्वतः मोदी यांनी दोलताशा पथकाशी संवाद साधतानाच ढोल पण वाजविला. वायफळ टोलनाकापर्यंत त्यांनी समृद्धी महामार्गावर 10 किलोमीटर राईड पण केली. ढोल ताशांच्या गजरात लेझीमच्या निनादात जल्लोषात त्यांचे या ठिकाणी स्वागत झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे ,भारती पवार, खासदार कृपाल तुमाने, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारआदी अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शाबासकीची थाप देखील यावेळी दिली.
शिंदे- फडणवीस यांच्याच काळात भूमिपूजन आणि लोकार्पण असा हा विलक्षण योग यानिमित्ताने जुळून आल्याने साहजिकच याप्रसंगी या दोघांच्याही चेहऱ्यावर स्वप्नपूर्तीचा आनंद झळकत होता. सुमारे साडेतीन तासाचा नागपूर दौरा असून सभास्थळी हजारो लोकांची गर्दी झाली आहे.अनेक वाहने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमुळे ठिकठिकाणी खोळंबली होती. जागोजागी स्क्रीनवर मोदी यांच्या दौऱ्याची झलक, अपडेट पहायला मिळत होते. पंतप्रधानांचे आगमन झाल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी अनेक मान्यवरांनी पंतप्रधान यांचे स्वागत केले. स्वागतचा स्वीकार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट मध्यवर्ती रेल्वे स्थानकाच्या दिशेने कारने रवाना झाले. मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर नागपूर -बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली. वंदे भारत एक्सप्रेसच्या अंतर्गत व्यवस्थेची पाहणी केली, अधिकाऱ्यांशी संवाद साधला यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सीताबर्डी झिरो मैल परिसरातील मेट्रोच्या फ्रीडम पार्क कडे रवाना झाले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात या फ्रीडम पार्कचे लोकार्पण करण्यात आले.यानंतर मेट्रोच्या प्रदर्शनाला देखील त्यांनी भेट दिली. यावेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित यांनी त्यांना माहिती दिली. यानंतर पंतप्रधान खापरीच्या दिशेने मेट्रो सफरसाठी रवाना झाले. अनेक विद्यार्थ्यांशी ,संवाद साधला. कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगारांशी देखील त्यांनी यावेळी संवाद साधला. खापरी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा समृद्धी महामार्गाच्या दिशेने वायफळ टोल नाक्याकडे रवाना झाला. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा एम्सच्या दिशेने रवाना झाला. एम्समध्ये डॉक्टरशी संवाद साधल्यानंतर एम्स लोकार्पण ते करतील व यानंतर सभास्थळी त्यांचे आगमन झाले. या ठिकाणी 75000 कोटी रुपयांच्या विविध योजनांचे पंतप्रधानांचे हस्ते लोकार्पण होणार आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने विदर्भ ,महाराष्ट्राच्या हिताच्या काही मोठ्या प्रकल्पांची घोषणा पंतप्रधान या नागपूर दौऱ्यात करण्याची अपेक्षा आहे.