आशियाई क्रिकेट स्पर्धाही आता पाकिस्तानबाहेर होणार

0

नवी दिल्लीः आशियाई क्रिकेट परिषदेने सप्टेंबर महिन्यात आयोजित होणाऱ्या आशिया कपचे आयोजन आता पाकिस्तान ऐवजी श्रीलंकेत होण्याची (Asia Cup Cricket Tournament) शक्यता आहे. आशिया कप स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानमधून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित करण्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा (PCB) प्रस्ताव सदस्य देशांनी फेटाळून लावल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या क्रिकेट वर्तुळात व रसिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

2 ते 17 सप्टेंबर दरम्यान पाकिस्तानमध्ये आशिया कपचे आयोजन प्रस्तावित होते. आता तो श्रीलंकेत होऊ शकतो. सध्या श्रीलंका यजमानपदासाठी प्रबळ दावेदार आहे. तथापि, आशिया चषक पाकिस्तानमधून बाहेर हलवण्याची अधिकृत घोषणा अद्याप एसीसीकडून करण्यात आलेली नाही. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नसल्याचे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले होते. बीसीसीआयने आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याची मागणी केली होती, परंतु पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ती अमान्य केली. पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ढासळलेली असून आशिया चषकच्या आयोजनामुळे ती सुधारण्यास मदत होईल, असा विश्वास पाकिस्तानला वाटत होता. मात्र, आता पाकिस्तानच्या साऱ्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे.
पाकिस्तानने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. त्यानुसार भारताचे सामने बाहेर हलविण्याती तयारी दर्शविली होती. तर स्पर्धेतील उर्वरित सामने पाकिस्तानमध्ये होणार होते. भारत फायनलमध्ये पोहोचल्यास अंतिम सामना देखील पाकिस्तान बाहेर आयोजित करण्याची तयारी होती.