“हा आमच्या घरातला प्रश्न…”..पवारांनी राऊतांना ठणकावले

0

मुंबईः ठाकरे गटाच्या मुखपत्रातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर आता शरद पवारांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. “हा आमच्या घरातला प्रश्न आहे” असे पवारांनी स्पष्टपणे बजावले. वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले’ असा आरोप मुखपत्रातून करण्यात आला होता. (Sharad Pawar Replay to Sanjay Raut ) “आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. हा आमच्या घरातला प्रश्न आहे”, असे पवारांनी स्पष्ट केले. शरद पवार म्हणाले की, “कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी राजीनामा मागे घेतला. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. आम्ही काय केले, ते त्यांना माहिती नाही.”

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, “आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचे काम करतो. त्यांना काहीही लिहू दे”, या शब्दात पवारांनी समाचार घेतला.

भाजपमध्ये आदेश चालतो

“भाजपमध्ये आदेशाची पद्धत आहे. तो आदेश एकनाथ शिंदे यांना मानावा लागतो. म्हणून ते कर्नाटकात प्रचार करत आहेत”, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही टोला हाणला. “पृथ्वीराज चव्हाण यांची त्यांच्या पक्षात काय परिस्थिती आहे, हे त्यांच्या पक्षातील नेत्यांना विचारले तर ते खासगीत सांगतो, असे म्हणतील”, असा टोला त्यांनी चव्हाणांना लगावला.

वारसदार निर्माण करण्यात अपयशी..”, ठाकरे गटाची पवारांवर टीका

“शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल, असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. त्यामुळे निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला होता…”, अशी थेट टीका पवारांवर करण्यात आली. शरद पवारांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादीचा गट बॅगा भरून…

शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात (Lok Maze Sangati) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दात टीका केली असल्याने ठाकरेंनी त्याची परतफेड केली की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असून पवारांनीही या टीकेला आज उत्तर दिले. “राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट भाजपमध्ये (BJP) जाण्यासाठी बॅगा भरुनच बसला होता”, असाही दावा ठाकरे गटाने केला आहे.

पवारांचे प्रत्युत्तर

या टीकेबद्धल विचारले असता शरद पवारांनी त्याला उत्तरही दिले आहे. पवार म्हणाले, “माझ्या वाचनात आलेले नाही. पण मी वाचल्यावर मत देईन. मात्र, आम्ही एकत्र काम करतो आणि एकत्र काम करत असताना पूर्ण माहितीवरच त्यावर भाष्य करणे योग्य होईल. नाहीतर उगाच गैरसमज होतात. माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल.”