गडकरींकडून महाराष्ट्रातील प्रकल्पांचा आढावा

0

 

मुंबईः केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी आज मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा आढावा घेतला. केंद्र आणि राज्याचे वरिष्ठ परिवहन अधिकारी या वेळी उपस्थित होते. (Nitin Gadkari took review of Maharashtra Project) सदर बैठकीत २०२३-२४ च्या भारतमाला तसेच वार्षीक योजनेत मंजूर करण्यात आलेल्या आणि कार्यान्वित असलेल्या राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

या प्रकल्पांमध्ये सूरत – चेन्नई एक्स्प्रेसवे, पुणे – बेंगलोर एक्स्प्रेसवे, पुणे – छ. संभाजी नगर एक्स्प्रेसवे, नाशिक फाटा – खेड, पुणे – शिरुर, तळेगाव – चाकण – शिक्रापूर, रावेत – नऱ्हे, हडपसर – यवत, तलोडा – बुऱ्हानपूर, बेल्लमपल्ली – गडचिरोली – दूर्ग या प्रस्तावित मेगा प्रकल्प तसेच एलिव्हेटेड कॉरिडॉर वर चर्चा करण्यात आली. याव्यतिरिक्त जलद गतीने भूसंपादन, आर्ब्रिटेशन, म्युटेशन प्रक्रिया, झाडे व फळझाडे यांच्या मुल्यांकनासाठी कालमर्यादा निश्चित करणे, जुन्या झाडांच्या प्रत्यारोपनासाठी १० किमी परिघाच्या आत जमीन उपलब्ध करून देणे, एनए भूखंडांच्या देयकासाठी धोरण निश्चत करणे, शासन, देवस्थाने तसेच ताब्यात घेतलेल्या जमिनींसाठी मोबदल्याचे धोरण निश्चित करणे, जमिन मालकांना निधीचे वितरण, महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी जलद भूसंपादन आणि निधीचे वितरण, वन परवाने, एनएचएआय प्रकल्पांसाठी उत्खनन परवानगी देण्यासाठी सिंगल विंडो फास्ट्रॅक प्रणाली आणि खाणीचे काम न थांबवण्याबात मार्गदर्शक तत्त्वांची निश्चिती करणे, राष्ट्रीय महामार्ग ६५२ वरील नळदुर्ग – अक्कलकोट विभागावरील ROW विवाद अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि लवकरात लवकर या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काम केले जावे, असे निर्देश देण्यात आले. याचप्रमाणे महाराष्ट्रातील रोप-वे प्रस्ताव, अजनी इंटरमॉडल स्टेशन, नागपूर येथील बसपोर्ट्स व खाणकामासाठी ईसी मंजूरी समस्या यावर देखील या बैठकीत विस्तृतपणे चर्चा करण्यात आली.