मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतला मतदार नोंदणीचा आढावा

0

नागपूर – जिल्ह्यातील मतदार यादी व मतदार नोंदणीचा आढावा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी आज घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक मीनल कळसकर, तहसीलदार राहूल सारंग, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी यावेळी यावेळी उपस्थित होते.
मतदार यादीत दोनदा असलेली नावे वगळावी. तसेच मय्यत मतदारांची नावे तत्काळ वगळावी. निवडणूकीस अजून एक वर्षाचा कालावधी असून या काळात मतदार यादी अचूक करण्याचे काम बिएलओनी करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले.
यंत्रणेनी नवमतदार नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालयात जावून मतदार वाढीवर भर द्यावा. अस्पष्ट छायाचित्र असणाऱ्या मतदारांना शोधून नवीन छायाचित्र करुन घ्यावे. यासाठी टाईम बाँड प्रोग्राम आखण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मतदार नोंदणीच्या कामात लागणारा अधिकचा भार कमी करण्यासाठी नगरपरिषद व गटविकास अधिकारी यांनाही सामावून घेतल्यास या कामात मदत होईल अशी मागणी करण्यात आली. त्यावर विचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणीची मोहीम राबविण्यात येते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मतदार केंद्राधिकाऱ्यांना कामावर यावे लागते. त्या रजेचा मोबदला देण्याविषयी मागणी करण्यात आली. याबाबत रजेचा मोबदला देण्याबाबत निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. तसेच याकामात लागणारी स्टेशनरी व टॅबबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक अधिकारी व मतदान केंद्राधिकारी यांच्या समस्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी जाणून घेवून त्यांच्याशी संवाद साधला. मतदार यादीत एकाच कुटुंबातील व्यक्ती इतरत्र विखुरले जातात. त्यांची तपासणी करणे कठीण जाते. त्यासाठी आडनावाप्रमाणे अल्फाबेटीकल मतदार यादी हवी असे बिएलओनी विनंती केली. त्यानुषंगाने मतदार यादी आडनाव प्रमाणे करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा