तातडीने हलविले रुग्णालयात : वर्धा जिल्ह्याच्या पालोरा येथील घटना
वर्धा. नातेवाईक रुग्णाला घेऊन नागपूरच्या (NAGPUR) रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांनी तपासताच मृत्यू झाला असल्याचे लक्षात आले. त्यांनी नातेवाईकांना याबाबत माहिती दिली. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शोकाकूल नातेवाईक मृतदेह गावी घेऊन परतले. तिथे अंत्यसंस्काराची तयारी केली जात होती. मृतदेह आंघोळीसाठी बाहेर काढण्यात आला. मृताच्या डोळ्यांची उघडझाप सुरू असून अंगही गरम झाल्याचे बहिणीला जाणवले (The eyes of the deceased were opening and the body was also felt warm). अन्य नातेवाईकांनीसुद्धा त्याला दुजोरा दिला. यामुळे सर्व तयारी जागच्या जागी ठेवून नातेवाईकांनी पुन्हा कारंजातील रुग्णालयात हलविले. तिथेही डॉक्टरांनी पुन्हा मृत घोषित केले. यानंतर संपूर्ण प्रकरणावर पडदा पडला. वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे तालुक्यातील पालोरा गावात ही आश्चर्यकारक घटना घाडली. सध्या पंचक्रोशीत याच घटनेची चर्चा सुरू आहे.
दिलीप रामोजी ढोले (३४) रा. पालोरा असे मृताचे नाव आहे. प्रकृती खालावल्याने त्याला २१ फेब्रवारीला रात्री २ वाजताच्या दरम्यान कारंजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, डॉक्टरांनी तपासणी करून रुग्णाला नागपुरला हलविण्याची सूचना केली. त्यानुसार नातेवाईकांनी रुग्णाला लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यानंतर दिलीप यांचा मृतदेह पालोरा या गावी परत आणला. आज त्यांच्या अंत्यसंस्काराची पूर्ण तयारी करुन आंघोळ घालत असताना त्यांनी डोळ्याची उघडझाप केल्याचे आणि अंग गरम असल्याचे बहिण संगिता यांच्या लक्षात आले. त्यामुळे आपला भाऊ जीवंत आहे, असे समजून सायंकाळी साडेसहा वाजतादरम्यान पुन्हा कारंजा येथील ग्रामीण रुग्णालय गाठले. येथील डॉ. स्मिता करणाके यांनीही मृत घोषित केले.
दिलीप ढोले यांच्या नातेवाईकांना ते जीवंत असल्याचा भास होऊ शकतो. यातूनच हा प्रकार घडला असावा. अन्यथा असा प्रकार घडू शकत नाही. मृत व्यक्तीला पुन्हा रुग्णालयात आणले असता त्यांचा इसीजी पल्स किंवा इतर शारीरिक कोणत्याही हालचाली सक्रीय नव्हत्या, असे रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले. पुन्हा मृतदेह घरू आणण्यात आला. त्यानंतर अंत्यसंस्कारही करण्यात आले.