माझ्या वक्तव्याचा विपर्यास, हक्कभंगाच्या नोटीशीवर संजय राऊतांचा बचावात्मक पवित्रा

0

मुंबई : विधिमंडळ हे चोरमंडळ असल्याचे आक्षेपार्ह वक्तव्य करणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी (Mp Sanjay Raut Reply on Notice) हक्कभंगाच्या नोटीशीला अखेर उत्तर दिले असून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा बचाव त्यांनी सुरु केला आहे. विधिमंडळाच्या सदस्यांचा अवमान करण्यासाठी वक्तव्य केलेले नसून ते एका विशिष्ट गटापुरते होते, त्यात विधिमंडळाच्या भावना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता व नाही. वक्तव्य तपासून बघावे, असा दावा राऊत यांनी केलाय. विधिमंडळाने संजय राऊतांना ४८ तासांमध्ये आपले म्हणणे लेखी मांडण्याची नोटीस दिली होती. शुक्रवारी संध्याकाळी संजय राऊतांची खुलासा सादर करण्याची मुदत संपली होती. मात्र, तोवर त्यांच्याकडून लेखी उत्तर आले नाही. त्यामुळे विधिमंडळाकडून पुढील कार्यवाही करण्यात येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच राऊत यांनी लेखी उत्तर सादर केले.
महाराष्ट्र विधान मंडळाचा व सदस्यांचा मी नेहमीच आदर करतो. प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. मी स्वतः अनेक वर्षे राज्यसभेचा सदस्य असल्याने मला अशा संसदीय मंडळांचे महत्त्व माहित आहे. मी संपूर्ण विधान मंडळाबाबत कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसून माझे वक्तव्य एका विशिष्ट गटापुरतेच मर्यादित आहे. या प्रकरणाबाबत सविस्तर खुलासा करण्याबाबत मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
संजय राऊत यांनी विधिमंडळ हे चोरमंडळ आहे, असे विधान केले होते. या विधानानंतर मोठा गदारोळ माजला होता. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा विषय चांगलाच लावून धरण्यात आला होता. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्याबाबत आक्रमक भूमिका घेतली. राऊतांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा