Home Top News पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२३ साठी नामांकन सादर करण्याची संधी

पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कार २०२३ साठी नामांकन सादर करण्याची संधी

0

 

नाशिक, १७ डिसेंबर : जलशक्ती मंत्रालय भारत सरकार यांच्या माध्यमातून सन 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट काम करणा-या जिल्हापातळी ते ग्रामपंचायत पातळीपर्यंत विविध संस्थाना व वैयक्तिक स्तरावरून नामांकन भरणेबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. नामांकन हे प्रामुख्याने जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित नाविण्यपूर्ण काम करणारे उत्कृष्ट राज्य, उत्कृष्ट जिल्हा, उत्कृष्ट ग्रामपंचायत, उत्कृष्ट शाळा व महाविद्यालय, उत्कृष्ट संस्था (शाळा व महाविद्यालय वगळून), उत्कृष्ट समाज संस्था, उत्कृष्ट पाणी वापर संस्था व उत्कृष्ट काम करणारी व्यक्ती यांच्या माध्यमातून राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर(www.awards.gov.in ) ३१ डिसेंबर अखेरपर्यंत भरणे आवश्यक आहे.

नामांकन भरण्यासाठी मागील एक वर्ष कालावधीत जलसंवर्धन व व्यवस्थापन संबंधित काम केलेल्या संस्था व व्यक्ती या पात्र असणार आहेत. या पुरस्कारासाठी नाशिक जिल्हयामध्ये जलसंवर्धनाचे व व्यवस्थापनाचे उत्कृष्ट काम करणा-या ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालये, समाजसंस्था किंवा उत्कृष्ट काम करणा-या व्यक्ती यांनी या स्पर्धेसाठी नामांकन भरावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. नाशिक जिल्हयातून नामांकन भरलेल्या संस्था/ व्यक्ती यांनी आपली संक्षिप्त माहिती जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या nbazpnashik1@gmail.com या मेलवर ३१ डिसेंबर पर्यंत सादर करावी असे आवाहन जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी केले आहे.