Home Top News छत्तीसगड : नक्षली हल्ल्यात सीआरफीएफचे उपनिरीक्षक हुतात्मा

छत्तीसगड : नक्षली हल्ल्यात सीआरफीएफचे उपनिरीक्षक हुतात्मा

0

CRFF sub-inspector martyred in Naxal attack

सुकमा, 17 डिसेंबर : छत्तीसगडच्या सुकमामधील जरागुंडा इथल्या बेंद्रे कॅम्पजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी हुतात्मा झाले. तर कॉन्स्टेबल रामू जखमी झाले आहेत. जखमी जवानाला प्राथमिक उपचार करून हेलिकॉप्टरने एअरलिफ्ट करण्यात आलेय.

यासंदर्भातील माहितीनुसार आज, रविवारी सकाळी 7 वाजता सीआरपीएफ 165 व्या बटालियनची एक कंपनी जगरगुंडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बेद्रे कॅम्प इथून शोध मोहिमेवर निघाली होती. उर्संगलकडे जात असताना नक्षलवाद्यांनी या जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी हुतात्मा झाले. याशिवाय एक हवालदार रामू यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी जवानाला प्राथमिक उपचारासाठी हेलिकॉप्टरने नेण्यात आलेय. हल्ल्यानंतरच्या झडतीदरम्यान सुरक्षा दलांनी 4 संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच सीआरपीएफ, कोब्रा आणि जिल्हा दलाच्या जवानांनी संयुक्त शोध मोहिम हाती घेतली आहे.

मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी सुकमा येथील चकमकीत हुतात्मा झालेले उपनिरीक्षक सुधाकर रेड्डी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. पीडितांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या. या घटनेत जखमी झालेल्या जवान रामूवर योग्य उपचार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.