शिंदे सरकारचे पहिले बजेट समाधानकारक – डॉ. आशिष देशमुख

0

 

नागपूर: “राज्याच्या अर्थसंकल्पातील नमो शेतकरी योजनेमुळे शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांवरून आता बारा हजार मिळणार, हा मोठा आधार आहे. विमा हप्त्याच्या २ टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून घेण्यात येत होती. आता शेतकर्‍यांना केवळ १ रुपयांत पीकविम्याचा निर्णय स्वागतार्ह असल्याचे माजी आमदार डॉ आशिष देशमुख यांनी म्हटले आहे.
विदर्भ, मराठवाड्यातील १४ आपत्तीग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी १८०० रुपयांची थेट आर्थिक मदत ही महत्वाची घोषणा आहे. लेक लाडकी ही योजना महाराष्ट्रात पहिल्यांदा येत आहे. असंघटित कामगारांच्या परिवाराच्या शिक्षणाबद्दल यात तरतूद केली आहे. ज्येष्ठांना आणि महिलांना एसटीत 50 टक्के सूट दिली आहे, ही चांगली गोष्ट आहे. शक्तिसदन योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन या चांगल्या बाबी आहेत. संजय गांधी निराधार योजनेत वाढ केली आहे. शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी
चांगल्या घोषणा केल्या आहेत.
भाजपची आणि शिंदेंची राजकीय तब्येत ढासळत असतांना या बजेटने त्यावर औषधोपचार केला. त्यामुळे बजेटसाठी सरकारचे अभिनंदन करणे भाग आहे. शिंदे सरकारचे पहिले बजेट समाधानकारक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रश्नचिन्ह

नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने खंबीर भूमिका घ्यायला पाहिजे होती. कारण त्यांच्या या भूमिकेने राजकीय परिस्थितीवर परिणाम होणार आहे. राष्ट्रवादीच्या संदर्भात राज्यात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. नागालॅंडमध्ये निवडून आलेले त्यांचे सर्व आमदार सत्तेसोबत गेले. लोकशाहीत प्रभावी विरोधक आवश्यक आहे. तेथे त्यांना विरोधी पक्षाची स्पेस घेता आली असती. पण त्यांनी तसे न करता भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. याचा फटका त्यांना महाराष्ट्रात नक्की बसेल, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा