आमदार अपात्रतेचा मुद्दा लांबणार, आमदारांनी मागितली मुदतवाढ

0

मुंबई- विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विचाराधीन असलेला शिवसेना आमदार अपात्रतेचा मुद्दा पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत (Disqualification of Shiv Sena MLA`s) आहे. शिवसेनेच्या ४० आमदारांनी विधिमंडळाच्या नोटीसीला उत्तर देताना मुदतवाढ मागितली आहे. विधिमंडळाकडून शिवसेनेच्या आमदारांना अपात्रतेच्या मुद्यावर नोटीस पाठवण्यात आली होती. या आमदारांना आता किमान दोन आठवड्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांमध्ये झालेल्या या बैठकीत आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्दयावर चर्चा झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी त्या नोटीसीला उत्तर दिले आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या या आमदारांनी मुदत वाढवून मागितल्याचे लक्षात आले आहे. उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांनाही नोटीस बजावण्यात आली होती. त्यांच्या उत्तरांचा आढावा घेणे बाकी असले तरी ठाकरे गटाने नोटीसीला उत्तर देण्याची गरज नसल्याची भूमिका घेतली होती, हे विशेष. या घटनांचा एकत्रित परिणाम म्हणून अपात्रतेचा मुद्दा थोडा लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहे. या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयातही याचिका प्रलंबित असून न्यायालय त्यावर काय निर्णय देते, याकडेही लक्ष लागलेले आहे.