गडचिरोली. नक्षलवाद्यांचा (Naxalites) गडचोरिली जिल्ह्यात (Gadchiroli District) हैदोस सुरूच आहे. आसा – कोरेपल्ली रस्त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनविभागाच्या ९ कर्मचाऱ्यांना नक्षल्यांनी बेदम मारहाण (Naxalites brutally beat up 9 employees of forest department along with forest area officers ) करून त्यांच्या ५ दुचाकी जाळल्याची घटना गुरुवारी सायंकाळनंतर नैनेरे मार्गावर घडली. रात्री उशिरा हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून (police filing a case) तपास सुरू केला आहे. जिल्ह्यात प्रशासनाकडून दुर्गम भागात रस्ते निर्मितीची कामे केली जात आहे. एकेकाळी नक्षल्यांचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या अहेरी तालुक्यातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील दुर्गम आसा-कोरेपल्ली मार्गाच्या प्रस्तावित बांधकामाचे सर्वेक्षण करण्यासाठी वनविभागाची चमू गुरुवारी तेथे गेली होती. परत येताना नैनेर मार्गावर ५ बंदुकधारी नक्षल्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वन निरीक्षकासह १० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावून घेत कर्मचाऱ्यांच्या ५ दुचाकी देखील जाळल्याची माहिती पुढे येत आहे.
रात्री उशिरा कर्मचाऱ्यांनी कमलापूर मुख्यालय गाठून वरिष्ठ कर्मचाऱ्यांना घटनेबाबत माहिती दिली. यासंदर्भात पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना विचारले असता त्यांनी दुजोरा दिला. मात्र, नक्षल्यांनी गाड्या जाळल्या की पळविल्या याबाबत अधिक तपासानंतर स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. या घटनेनंतर परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध नक्षल्यांनी बॅनरबाजी
माजी राज्यमंत्री आणि अहेरीचे विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध पुन्हा एटापल्ली तालुक्यात नक्षल्यांचे बॅनर आढळले आहे. दरम्यान विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना गडचिरोली जिल्ह्यासाठी झेड सुरक्षा देण्यात आली आहे. नक्षलवाद्यांचा विरोध असलेल्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीला मदत करत असल्यावरून नक्षलवाद्यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला धर्मरावबाबा यांच्याविरुद्ध आगपाखड करत त्यांना बॅनरच्या माध्यमातून धमकी दिली होती. हा मुद्दा विधिमंडळात गाजल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पूर्ण सुरक्षा दिली जाईल असे स्पष्ट केले होते. गुरुवारी रात्री पुन्हा नक्षल्यांनी बॅनर लावले. दरम्यान आ. धर्मरावबाबा यांना गडचिरोली जिल्ह्यासाठी झेड सुरक्षा दिली असून विशेष सुरक्षा पथकाचे (एसपीओ) १० जवान त्यांच्या सुरक्षेत तैनात आहेत.