नागपूर : गेल्यावेळी चंद्रपूर येथील राज्यात एकमेव असलेले काँग्रेसचे खासदारही भाजपात येतील असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात केला . भाजपने आता विदर्भातील विधानसभेच्या 50 आणि राज्यातील लोकसभेच्या सर्व 11 जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे 51 टक्के मतदान भाजप कसे मिळेल, याचे नियोजन केले जात आहे. विरोधात कितीही पक्ष एकत्रित आले तरी सर्वांशी ‘वन बाय वन’ लढण्याची भाजपची तयारी असल्याचा निर्धार बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक नागपुरात आज सुरू झाली. उद्घाटनानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मविआने राज्यात दडपशाहीचे राजकारण केले. आम्ही पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात देशाचा, महाराष्ट्राचा विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे. 30 जून पासून आतापर्यंत ओबीसी आरक्षणासह अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही घेतले. विकास कामे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.
सत्तेच्या माध्यमातून संघटन मजबुतीचा आमचा प्रयत्न असून केंद्र व राज्याचे सरकार समन्वयातून काम करीत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राला खूप काही देण्यासाठी तयार असताना अडीच वर्षे उद्धव ठाकरेंना केंद्र सरकारचे सहकार्य घेता आले नाही, अनेक योजनांचा पैसा परत गेल्याचा आरोप केला. 2024 मध्ये एक लक्ष बुथवर प्रत्येकी 30 -30 कार्यकर्ते काम करीत आहेत. विविध योजना तयार केल्या जात आहेत असे सांगितले. आपल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या काळात मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यावेत या काल केलेल्या विधानावर त्यांनी आज काहीसे घुमजाव केले. हे विधान आजच्या सरकार संदर्भात नव्हते. सामाजिक कार्यक्रमात मी ते बोललो. सामान्य कार्यकर्त्यांची भावना, ज्या समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मदत केली त्या समाजाची भावना मी बोललो. भाजपच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे तर मला देखील ते मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते. मात्र तूर्त राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार समन्वयातून काम करीत आहे यावर त्यांनी भर दिला. मी अध्यक्ष म्हणून केवळ चारच महिने झाले अजून बराच कार्यकाळ शिल्लक आहे या शब्दात त्यांनी भविष्यातील संकेतही दिले. मलाच नाही तर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते पण आजचा विषय नाही असे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.
गेल्यावेळी विदर्भात चंद्रपूर लोकसभेची काँग्रेसने जिंकली होती पुढील वेळी ती जागा देखील आम्ही जिंकू असे सांगत त्यांनी 2024 मध्ये ते उमेदवार देखील आमच्यात आलेले असतील असा दावा केला. विदर्भाच्या अनुशेषावर बोलण्याचा अधिकारच विरोधीपक्षनेते अजितदादा पवार यांना नाही. विदर्भ विकास महामंडळ मुदतवाढ देण्यात आलेली नाही. विदर्भ, मराठवाड्याशी सातत्याने बेईमानी केली असा आरोप त्यांनी केला. सीमावाद बाबत बोलताना इतके वर्ष तुम्ही सत्तेत असताना काय केले, असा सवाल पवार यांना केला. आमच्या कार्यकाळात गृहमंत्र्यांनी बैठक घेतली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईल तो सर्वांना मान्य असणार आहे यावर भर दिला. बारामती सोडून त्यांनी महाराष्ट्राचा कुठला विकास केला असा सवाल उपस्थित केला. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री गृहमंत्र्याच्या बैठकीनंतरही ऐकत नाहीत याकडे लक्ष वेधले असता या नेत्यांना विकासावर बोलण्याचे नाक नाही त्यामुळे ते सीमा प्रश्न, महापुरुषांचा अपमान अशा भावनिक मुद्द्यांवर त्यांचे राजकारण सुरू आहे राज्यातील जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप बावनकुळे यांनी केला.
बॉक्ससाठी अडीच वर्षे उद्धव ठाकरे का आले नाही ? विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचे आज आगमन होत आहे याकडे लक्ष वेधले असता अडीच वर्षे ते का आले नाहीत, अधिवेशन का घेतले नाही, आता विदर्भातील जनतेने त्यांची आरती ओवाळायची का ? असा परखड सवाल केला. उद्धवजी तुमचा काळ गेला. 2024 मध्ये तुम्हाला उमेदवार देखील भेटणार नाही. आता शिंदे -देवेंद्रजी यांच्या सरकारचा काळ आहे असा टोला लगावला.तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्या या अजित दादांच्या मागणीवर दादांच्या काळात अधिवेशन किती दिवस चालले हे रेकॉर्ड तपासून पहा असे त्यांनी सुनावले.