मुंबई : संसदेची नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेताना मोदी सरकारने आम्हाला अजिबात विश्वासात घेतले नाही. त्यामुळेच विरोधी पक्षांनी कार्यक्रमावर बहिष्काराची भूमिका घेतल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी (NCP President Sharad Pawar on New Parliament) सांगितले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन उद्या रविवारी होणार असून उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केली आहे. मात्र, उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्तेच होणार, यावर सरकार ठाम आहे.
विरोधकांच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे सांगून शरद पवार म्हणाले की, मागील अनेक दशकांपासून आपण संसदेचे सदस्य आहोत. संसदेच्या वास्तुत आम्ही बसतो. संसदेची नवी वास्तु बांधणार असल्याचे आम्हाला प्रसार माध्यमांकडून कळले होते. इतका महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. आता संसदेची नवी वास्तू तयार झाली. मात्र, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होत असते. तशी पद्धत आहे. त्यामुळे या नव्या संसदेचे राष्ट्रपतींनी उद्घाटन करावे, अशी मागणी होती. ती देखील त्यांनी मान्य केली नाही. उदघाटनाचा कार्यक्रम ठरला. मात्र, त्याचीही चर्चा कधी झाली नाही. कोणाला विश्वासात न घेता असे कार्यक्रम घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षांनी त्या कार्यक्रमाला जाऊ नये, ही भूमिका योग्यच आहे, असे पवार म्हणाले.