मुंबईः राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यावर त्याच्याबद्धल वेगळीच माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून पवार यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा व्यक्तीचा शोध सुरू केला असता तो बिहारचा रहिवासी असल्याचे उघडकीस आले (Bihar Man Arrested For Making Threat Calls To Sharad Pawar). त्याला बिहारमधून अटक करण्यात महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव नारायण कुमार सोनी असे असून त्याने यामागे सांगितले कारण ऐकून पोलिसही थक्क झाले.
नारायण सोनी याचा पत्नीशी वाद झाल्यावर ती त्याला सोडून गेली. त्यानंतर तिने दुसरे लग्नही केले होते. या प्रकरणात शरद पवार यांनी काहीही कारवाई न केल्याचा राग मनात धरून त्याने पवार यांना धमकी दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. काल मंगळवारी ही घटना घडली होती. फोनवरून धमकी देणारा व्यक्ती हिंदीतून बोलत होता. पोलिसांच्या मते नारायण सोनी हा मनोरुग्ण आहे. नारायण सोनी हा 10 वर्ष पुण्यात राहिला. त्याच्यासोबत त्याची पत्नीही होती. मात्र दोघांचे बिनसल्याने दोघेही वेगळे झाले. पत्नीने नंतर नारायण सोनीला सोडून दुसऱ्या व्यक्तीशी लग्न गेले. पती-पत्नीच्या भांडणात शरद पवार यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा त्याचा दावा आहे.