पुणे, 28 मे राज्यात बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाला आता नियमांची वेसण घालण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रम, राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यत आयोजित करण्यास मज्जाव करण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने १८ मे रोजीच्या अंतिम आदेशात नियमांच्या चौकटीत राहून बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाला परवानगी दिली होती. या निर्णयाचे राजकीय क्षेत्रातून जोरदार स्वागत करण्यात आले होते. बैलगाडा शर्यतींचा मुद्दा राजकीयदृष्टय़ा संवेदनशील झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या अटींनुसार आता राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांच प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात बैलगाडा शर्यतींबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये याबाबतच्या सुस्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
















