पुणे, 28 मे (हिं.स.) महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीचाच अवलंब करण्यात आला आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अकरावी प्रवेशासाठी गेल्या तीन दिवसांत 16 हजार 812 विद्यार्थ्यांनी पोर्टलवर नोंदणी करुन प्रवेश अर्जाचा भाग-1 भरला आहे.
अकरावी प्रवेशाचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली आहे. पुणे विभागात एकूण 319 कनिष्ठ महाविद्यालये आहेत. महाविद्यालयांच्या नोंदणीसाठी 30 मे ते 6 जून अशी मुदत देण्यात आलेली आहे. नवीन रजीस्ट्रेशन व माहितीत बदल करावयाचा असल्यास 29 मे रोजी घेण्यात येणाऱ्या शिबिरात महाविद्यालयांना कागदपत्रासह सहभागी व्हावे लागणार आहे.
अकरावी प्रवेशाच्या अर्जाचा भाग-1 भरुन तो प्रमाणित करण्यासाठी 25 मेपासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन सुुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. दहावीचा निकाल लागल्यानंतर दोन दिवसांपर्यंत ही सुविधा सुरू राहणार आहे. दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता असून निकाल लागल्यानंतर प्रवेश अर्जाचा भाग-2 विद्यार्थ्यांना भरता येणार आहे. यात प्रामुख्याने कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवावे लागणार आहेत.















