क्रिकेटच्या महाकुंभाचं वेळापत्रक जाहीर, ५ ऑक्टोबरला सुरुवात

0

नवी दिल्ली- यावर्षी भारतात होणाऱया एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक आज जाहीर झाले. ५ ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवात होणार असून पहिला सामना अमदाबादमध्ये इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामन्याचा थरार १९ नोव्हेंबरला अमदाबादमध्येच रंगणार असून या स्पर्धेत १५ ऑक्टोबर रोजी याच नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत-पाकिस्तान सामना खेळला जाणार आहे. आयसीसीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. (Cricket World Cup-2023)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १५ ऑक्टोबर रोजी अमदाबादला होणार आहे. अहमदाबाद व्यतिरिक्त पाकिस्तानचे सामने हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे होणार आहेत. एकूण १२ शहरांमध्ये स्पर्धेचे सामने खेळले जाणार असून त्यात नागपूरचा समावेश नाही. हे सामने अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम), बंगळुरू (एम चिन्नास्वामी स्टेडियम), चेन्नई (एमए चिदंबरम स्टेडियम), दिल्ली (अरुण जेटली क्रिकेट स्टेडियम), धर्मशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम), गुवाहाटी (आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम), हैदराबाद (राजीव गांधी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, उप्पल), कोलकाता (ईडन गार्डन), लखनौ (एकना क्रिकेट स्टेडियम), इंदूर (होळकर स्टेडियम), मुंबई (वानखेडे स्टेडियम) आणि राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे खेळले जातील. स्पर्धेत तीन बाद फेरीसह ४८ सामने खेळवले जाणार आहेत. भारत प्रथमच संपूर्ण विश्वचषकाचे यजमानपद भूषविणार आहे. यापूर्वी, भारताने शेजारील देशांसह या स्पर्धेचे आयोजन केले होते. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारत, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी थेट पात्र ठरले आहेत. आता उर्वरित दोन संघ पात्रता फेरीतून उतरतील, अशी माहिती सूत्रांनी दिलीी.