क्रिकेटचा देव सचिनच्या दर्शनाने शाळकरी मुले भारावली

0

चंद्रपूर CHNDRAPUR : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे ताडोबा प्रेम सर्वविदित आहे. तो सातत्याने व्याघ्रदर्शनासाठी ताडोबात येतो व जंगल सफारीचा आनंद घेतो. आता सचिन पुन्हा ताडोबात असून त्याने शुक्रवारी अलिझंजा येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना स्कूलबॅग, पेन, पुस्तकांची भेट दिली. (Sachin Tendulkar Visit Tadoba School) सचिनकडून मिळालेल्या भेटीमुळे शाळकरी विद्यार्थी, शिक्षकवर्ग अक्षरशः भारावून गेला होता. गेल्या महिन्यात सचिन ताडोबात आला होता. त्यावेळीच त्याने या शाळेत येण्याचे आणि विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्याचे आश्वासन दिले होते. यानिमित्ताने सचिनने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली.

सचिनला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प  (Tadoba Andhari Tiger Reserve)  व त्यातील जंगलसफारी फार आवडते. आजवर त्याने ताडोबाला पाचवेळा भेट दिली आहे. मागील भेटीत ताडोबा सफारीसाठी आलेल्या सचिनला अलिझंजा प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. चौथ्या वर्गातील पाठ्यपुस्तकात कोलाज नावाचा पाठ आहे. हा पाठ सचिनवर आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पाठात असलेल्या पात्राला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी सचिनने शाळेत येण्याचे आश्वासन विद्यार्थ्यांना दिले होते. गुरुवारी सचिन, पत्नी अंजली आणि आपल्या मित्रांसोबत ताडोबात दाखल झाला. त्याने जंगल सफारीचा आनंद घेतला. ताडोबाच्या गाभा क्षेत्रात त्याने तारा वाघिणीचे दर्शनही घेतले. शुक्रवारी सकाळी पुन्हा त्याने सफारीचा आनंद लुटला. यावेळी त्याला वाघांसह बिबट व अस्वलाचेही दर्शन झाल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतर सचिनने शाळेला भेट दिली. सचिन कुटुंबासह गावात येणार असल्याने शाळेपुढे रांगोळी घालून स्वागताची तयारी करण्यात आली. सचिन, पत्नी अंजलीसह आल्यानंतर त्यांचे औक्षवण करण्यात आले. त्यांनतर वर्गात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळेस सचिनने विद्यार्थ्यांशी हितगुज करीत मागील भेटीतील आठवण सांगितल्या. यानंतर त्याने स्वतःच्या हाताने भेटवस्तु वितरित केल्या. सचिनच्या या भेटीत गावाचे सरपंच गजाननराव वाकडे, ग्राम पंचायतच्या सदस्या सुनीता नन्नावरे, शाळेचे अध्यक्ष शंकर चौखे, मुख्याध्यापक रमेश बदके, शिक्षका मनीषा बावनककर तसेच गिरीधर वाकडे उपस्थित होते. या भेटीमुळे शाळेचे विद्यार्थी अक्षरशः भारावून गेले होते. गावात दिवसभर सचिनच्या आगमनाची चर्चा होती.