पांढरकवड्यात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकरी हैराण
यवतमाळ. जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यात (Pandharakawda Taluka of Yavatmal District ) गेल्या काही दिवसांपासून शेतपीक लंपास करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ सुरू आहे. प्रामुख्याने पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाच्या चोरीवर त्यांचा भर आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. अशीच एक घटना तालुक्यातील रूढा शेतशिवारातून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ६० हजार रुपये किमतीचा २० क्विंटल कापूस लंपास केल्याची अलिकडेच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला (Pandharkawda police have registered a case against unknown thieves ) आहे. चोरट्यांच्या उपद्रवामुळ जीवाहून अधिक जपलेले पीक मातीमोल ठरले आहे. हाता तोंडाशी आलेल्या घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या प्रकारानंतर संताप व्याप्त असून चोरट्यांना तत्काळ शोधून काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
पिंपळखुटा येथील रहिवासी शेतकरी सुधीर संजय रासमवार यांचे रूढा शिवारात शेत आहे. भर पावसातही त्यांनी शेतात उभे पीक जपले. योग्यरित्या संगोपण केले. यंदा पीकही चांगले बहरले. यामुळे त्यांना मोठ्या अपेक्षाही होत्या. सध्या त्यांच्या शेतात कापसाची वेचाई सुरू आहे. वेचण्यात आलेला कापूस त्यांनी शेतातील बंड्यांमध्ये ठेवला होता. अज्ञात चोरट्यांनी संधी साधून १२ फेब्रुवारीला बंड्याचे दार तोडून आत ठेवून असलेला २० क्विंटल कापूस लंपास केला. यामुळे सुधीर रासमवार यांना १ लाख ६० हजार रुपयांचा फटका बसला. घटना उघडकीस आल्यानंतर सुधीर रासमवार यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविचे कलम ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.
शेतकऱ्यांचा इशारा
वणी विधानसभा मतदारसंघातील शेतकरी विविध समस्यांशी झुंजत आहेत. शेतपिकाच्या चोरीच्या घटना उघडकीस येत आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासोबत शेतकरी हिताचे धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.