नागपूर : कर्नाटकातील निवडणूक निकालांमुळे महाराष्ट्रातील काही नेत्यांचा आनंद म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी अवस्था असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis in Nagpur) यांनी केली आहे. नागपूर येथे माध्यमांशी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कर्नाटकमध्ये भाजपाला अपेक्षित यश आले नाही. एखादा अपवाद वगळला तर 1985 पासून कुठलेही सत्तेतील सरकार पुन्हा जनतेने निवडून दिले नाही. सरकार सतत बदलत असते. यावेळी ही मालिका खंडित करण्याची आम्हाला शाश्वती होती. पण, तसे झाले नाही.
यामुळे पराभव
थोडे विश्लेषण केले तर असे लक्षात येते की, 2018 मध्ये आमच्या 106 जागा आल्या होत्या, तेव्हा 36 टक्के मते आम्हाला मिळाली होती, आता 2023 मध्ये ती 35.8 टक्के इतकी आहेत. भाजपाची मते केवळ 0.2 टक्के कमी झाली. पण, जागा 40 ने कमी झाल्या. जेडीएसची मते गेल्या निवडणुकीपेक्षा 5 टक्क्यांनी कमी झाली आणि ती संपूर्ण 5 टक्के मत काँग्रेसला मिळाली आणि त्यांना जागांचा मोठा फायदा झाला. भाजपाच्या मतांवर परिणाम झालेला नाही. ज्यांना आज आनंद होतोय, त्यांनी विधानसभेचे निकाल आणि त्यानंतर लगेच लागलेले लोकसभेचे निकाल हेही एकदा तपासून पहावे. त्यात अंतर आहे. आजच उत्तरप्रदेशात महापालिकांमध्ये भाजपाने एकहाती आणि सर्व ठिकाणी सत्ता प्राप्त केली आहे.
बेगानी शादीमे..
आज महाराष्ट्रात ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’, असे नेते पहायला मिळतात. ज्यांचा कर्नाटकात एकही उमेदवार नाही, असे लोक सुद्धा आज नाचताना पहायला मिळतात. असे लोक जन्मभर दुसर्यांच्या घरी मुलगा झाला की आनंद साजरा करीत असतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे मला योग्य वाटत नाही. एक मात्र नक्की सांगतो की, कर्नाटकच्या निकालांचा महाराष्ट्रावर किंवा देशावर कुठलाच परिणाम होणार नाही. देशात पुन्हा मोदीजीच येणार आणि महाराष्ट्रात पुन्हा आमचेच सरकार येणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. पप्पू मेरिटमध्ये आल्याच्या प्रतिक्रियांबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी राहुल गांधींना अखेर पप्पू हे मान्य केले हे चांगले केले.
निपाणीच्या लोकांनी ऐकले
शरद पवार यांनी केलेल्या टीकेबाबत पत्रकारांनी विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निपाणीच्या लोकांनी माझे ऐकले आणि त्यांचा उमेदवार ‘पॅक’ करुन परत पाठविला. त्यांच्या पक्षाला 0.27 टक्के मते मिळाली आहेत. निपाणीच्या जनतेने माझे ऐकले आता मी राष्ट्रवादीवर काय प्रतिक्रिया देऊ?