मुंबई :सध्या जागावाटपाचा विषय नसून भाजपला सत्तेच्या बाहेर कसे करायचे, हाच महत्वाचा विषय असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State Congress President on Seat sharing in Maharashtra) यांनी व्यक्त केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जागा वाटपाबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय झालेला नसून भाजपला सत्तेबाहेर करणे, हेच महत्वाचे असल्याचे पटोले म्हणाले. एका वाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीत लोकसभेसाठी जागावाटप झाल्याचा इन्कार केला. भाजपच्या विरोधात प्रामाणिकपणे जे असतील त्यांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे. वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा प्रस्ताव अद्याप आला नाही. त्यांचे नेमके मत काय आहे, हे समजल्याशिवाय आम्ही त्यांचीशी बोलणार नाही. आम्ही त्यांना कोणताही प्रस्ताव दिला नसल्याचे पटोले म्हणाले.
भाजप अमरपट्टा घेऊन आल्याप्रमाणे देशात व महाराष्ट्रात वागत आहे. लोकशाहीत अनेक चमत्कार होतात. स्व. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता, असे पटोले म्हणाले. प्रकाश आंबेडकरांकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही. पुढच्या काळात कुठेही धोका होता कामा नये, याची काळजी आम्ही घेत आहोत. कारण जनतेचा राग हा सत्तेत बसलेल्या लोकांच्या विरोधात आहे. त्या रागाला एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे पटोले म्हणाले. काँग्रसेच्या ताब्यात असणाऱ्या हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटक निवडणुकीच्या जाहीरनाम्यातही आम्ही जुन्या पेन्शनच्या योजनेचा उल्लेख करणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.