चंद्रपूर : राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी, यासाठी संप सुरु असताना आर्थिकदृष्ट्या सक्षम माजी खासदारांनी पेन्शन बंद (No Pension for financially able MP`s) करावी, अशी मागणी काँग्रेसचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे केलीय. धानोरकर यांनी यासंदर्भात काही खासदारांची यादीही दिली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत एकूण ४७९६ माजी खासदार आहेत. या माजी खासदारांना दरवर्षी ५० कोटी रुपयांची रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. यात ३०० माजी खासदारांचे आश्रित परिवार देखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, मायावती, सिताराम येचुरी, मणीशंकर अय्यर, रेखा, चिरंजीवी यांच्यासह अनेक सधन व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्टीने सक्षम असलेल्या माजी खासदारांची पेन्शन बंद करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Congress MP Balu Dhanorkar).
सध्या महाराष्ट्रात जुन्या पेन्शनच्या मागणीवरून वादंग निर्माण झाले आहे. राज्य कर्मचारी मागील दोन दिवसांपासून सामुहिक संपावर आहेत. जुनी पेन्शन योजना लागू न करण्यामागे यातून पडणारा आर्थिक भार हे कारण सरकारकडून सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी लोकप्रतिधींना मिळणारे वेतन व पेन्शन सुविधांवर बोट ठेवले आहे. हाच न्याय लोकप्रतिनिधींना पेन्शनच्या सुविधा पुरविताना लावायला हवा, याकडे लक्ष वेधले जात आहे. राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे.