मुंबई :अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले असताना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी (NCP President Sharad Pawar) मात्र आपल्या पक्षात कोणताही गट अन् वाद नसल्याचे निवडणूक आयोगापुढे स्पष्ट केले आहे. शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या उत्तरात हा दावा करण्यात आला आहे. शरद पवार यांच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नुकतेच निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. त्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या पत्रावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, शरद पवारांनी पाठवलेल्या आपल्या उत्तरात आपल्या पक्षात कोणतेही गटतट नसल्याचा दावा करण्यात आला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा ठोकणे अकाली व दुर्दैवी असून ही मागणी आयोगाने फेटाळली पाहिजे, असे शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी या गटाने पक्षात कोणतेही गटतट नसल्याचा तर्क दिलाय. राष्ट्रवादीत कोणता वाद आहे, हे सिद्ध करण्यास अजित पवार सकृतदर्शनी सक्षम नाहीत. त्याचप्रमाणे 1 जुलै 2023 पूर्वी अजित पवारांनी शरद पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच शरद पवार किंवा पक्षाच्या अन्य कोणत्याही नेत्यांच्या बैठकीत त्यांनी विरोधही केला नव्हता, अशी बाब शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाचा लढा शिवसेनेच्या मार्गाने जात आहे. शिवसेनेसारखाच अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार अजित पवारांच्या गोटात आहेत. त्यामुळे त्यांच्याच गटाला पक्षाचे नाव व चिन्ह देण्यात यावे, असे त्यांचे म्हणणे आहे.