मुस्लिमांनी भिण्याची गरज नाही-सरसंघचालक

0

नवी दिल्ली : “मुस्लिम समाजाने भारतात घाबरण्याची गरजच नाही. ते सुरक्षितच आहेत. पण, या समाजाने आपली श्रेष्ठत्वाची मानसिकता आता सोडली पाहिजे. या देशावर आम्ही राज्य केले व पुन्हा राज्य करु, या मानसिकतेतून मुस्लिम समाजाने बाहेर आले पाहिजे… ” असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी देशातील मुस्लिम समाजाला (RSS Chief on Muslim Community) दिलाय. ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत डॉ. भागवत यांनी ही भूमिका मांडली आहे. “आम्ही महान आहोत आणि या देशावर आम्ही राज्य केलंय. देशावर आम्ही पुन्हा राज्य करू व आमचाच मार्ग योग्य असून बाकी सर्वकाही चुकीचे आहे. आम्ही वेगळे आहोत आणि तसेच राहणार. हा दृष्टीकोन सोडून द्यायला हवा. तो हिंदु असो किंवा कम्युनिस्ट कोणीच बाळगता कामा नये ” असेही डॉ. भागवत म्हणाले.


सरसंघचालक डॉ. भागवत म्हणाले की, हिंदू ही आपली ओळख, आपली सभ्यता, आपले राष्ट्रीयत्व आहे. हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा गुण आहे. आम्ही खरे बाकी सर्व चूक असे आम्ही कधीच म्हणत नाही. आपण दोघंही आपापल्या जागी योग्य आहोत, अशीच भूमिका राहते. त्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही. एकत्र वाटचाल करायला आम्ही शिकले पाहिजे, असेही ते म्हणाले. संघाने स्वतःला नेहमीच राजकारणापासून अलिप्त ठेवले आहे. पूर्वी संघाचे स्वयंसेवक सत्तेत नव्हते. आज ते सत्तेत आहेत, एवढाच काय तो फरक आहे. समाजाला संघटित करण्याचे संघाचे प्रयत्न आहेत, असेही ते म्हणाले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा