अमरावती: प्रहार संघटनेचे नेते व माजी मंत्री बच्चू कडू हे अपघातात जखमी झाले आहेत. रस्ता ओलांडताना एका दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्यांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला आहे. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्रावही झाला आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Bacchu Kadu Accident)त्यांच्या डोक्याला चार टाके पडले असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. अमरावती शहरात बुधवारी सकाळी सहा ते साडेसहा च्या दरम्यान रस्ता ओलांडताना एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. या दुचाकीच्या धडकेत ते रस्यावरील दुभाजकावर आदळले व त्यांच्या डोक्याला मोठा मार बसला. त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
अमरावती शहरातील कठोरा रोड परीसरात ते चालत असताना अचानक एका दुचाकीस्वाराने त्यांना धडक दिली. पहाटेच्या अंधारात काहीही लक्षात आले नाही. त्यांच्या सहकाऱ्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकीचालकाचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. स्वतः कडू यानी या अपघाताची माहिती ट्विट केली असून आपल्या समर्थकांनी व हितचिंतकांनी भेटायला येऊ नये, असे आवाहन केले आहे.
बच्चू कडू हे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार आहेत. ठाकरे सरकारमध्ये मंत्रिपद भूषवल्यानंतर बच्चू कडू एकनाथ शिंदे यांच्यासह सत्तेतून बाहेर पडले होते. सध्या बच्चू कडू यांना मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या अपघातामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रहारकडून लढणाऱ्या उमेदवारांची घोषणा लांबणीवर पडली आहे.