मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार आणि मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यावरून भाजप आणि शिंदे गटात वाद निर्माण झाल्याची चर्चा असून (BJP And Shinde Group) भाजपने उमेदवार निश्चित करताना विश्वासात घेतले नसल्याचा दावा शिंदे गटाकडून सुरु आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत त्यावर नाराजीचे सूर व्यक्त झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याची नाराजी शिंदे गटाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त झाल्याची माहिती आहे. विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक होत असून भाजपने चार उमेदवारांची घोषणा आतापर्यंत केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेतून तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यावरुनच भाजप आणि शिंदे गटात धूसफूस सुरु आहे. भाजपने परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्धल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. कोकण आणि नाशिकच्या जागेवर शिंदे गटाकडून दावा सांगितला जात होता. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासंदर्भात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांनची नेमणूक करण्याचा निर्णयही या वादाचे कारण ठरत असून या नियुक्तीमुळे पोलिस दलात नाराजीची भावना असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, शिंदे गटाची ही नाराजी भाजप कशी दूर करणार, याकडे लक्ष लागलेले आहे.