ईडीने का छापा टाकला? मुश्रीफांनी पुराव्यासह दिलं उत्तर

0

मुंबई – ईडीच्या छाप्यानंतर संतप्त झालेले राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेत्यांवर (NCP Leader Hasan Mushrif allegation against BJP Leader) आरोप गेले आहे. कागलमधील भाजप नेत्यांनी दिल्लीला जाऊन माझ्याविरोधात खोटी तक्रार दिली, असा आरोप त्यांनी केला. माझ्याविरोधात तक्रार करणारे भाजप नेते हे समरजीत घाडगे असल्याचे मुश्रीफ यांनी नंतर स्पष्ट केले. मुश्रीफ म्हणाले की, मी काळा पैसा शेल कंपन्यांमार्फत कारखान्याकडे वळवल्याचा त्यांचा आरोप आहे. वास्तविक पाहता मी कारखान्याचा संचालक नाही. तसेच रजिस्ट्रार ऑफ कंपनीनेच शेल कंपन्याविरोधात खटला दाखल केला आहे. हा खटला उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, असे मुश्रीफ म्हणाले.


कोल्हापूर जिल्ह्यातील माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील बंगल्यावर, संताजी घोरपडे साखर कारखाना आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर बुधवारी सकाळी ईडीने छापे घातले. या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप नेत्यांवर आरोप केले. ब्रिक्स कंपनीशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. गडहिंग्लज कारखान्याचा लिलाव केला नाही तर शासनाच्या नियमाप्रमाणे हा कारखाना ब्रिक्सला चालवायला दिला होता. मात्र ही कंपनी दोन वर्षे आधीच तोटा झाल्यामुळे सोडून गेली. तेथे आता संचालक मंडळ निवडून आले असल्याचे ते म्हणाले. आपल्या जावयावर खोटे आरोप करण्यात येत असून लहान मुले, महिलांना, घरातील सदस्यांना त्रास देण्यात येत आहे. राजकारणासाठी हे करणे अयोग्य असल्याचे मुश्रीफ म्हणाले. कागलमधील एका भाजप नेत्याने दिल्लीत जावून माझ्यावर कारवाई कऱण्यासाठी प्रयत्न केले होते. चार दिवसांपूर्वीच भाजप नेत्याने सांगितले होते की, कारवाई होणार आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.