कळवण, २८ मे, – साडेतीन शक्तीपीठ पैकी एक असलेल्या वणीच्या सप्तशृंगी देवीच्या मंदिरासाठी आता पूर्ण ड्रेस घालूनच दर्शन घ्यावे लागणार आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच मंदिर प्रशासनाच्या वतीने काढण्यात येणार आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांना आता पूर्ण पेहरावात आल्यावरच सप्तशृंगी देवीचे दर्शन घेता येईल. तसेच आरती आणि पूजेच्या कालावधीत आलेल्या आणि नोंदणी केलेल्या भाविकांनाच गाभाऱ्यात दर्शन घेता येणार असून पुरुषांना सोवळे तर महिलांना साडी नेसून आरतीनंतर दर्शन घेता येणार असल्याचे देवस्थान ट्रस्टने म्हटले आहे. त्यामुळे यापुढे भाविकांना सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जातांना पूर्ण पेहरावात जावे लागणार आहे.
दरम्यान, सप्तशृंगी मंदिरातील पावित्र्य जपण्यासाठी भाविकांना ड्रेस कोड लागू व्हावा, त्यासाठी विश्वस्त मंडळातील काही सदस्यांसह सप्तशृंगगड ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि भाविक सकारात्मक असून लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती सप्तशृंगीगडचे सरपंच रमेश पवार, विश्वस्त ॲड. ललीत निकम आणि ग्रामस्थांनी दिली आहे.















