ही तर प्रकाश आंबेडकरांची मानसिक दिवाळखोरी-बावनकुळे

0

नागपूरः महाविकास आघाडीत जागा मिळविण्यासाठी धडपडत असलेले वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (VBA President Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आगामी काळात केंद्रात बिगर भाजपा सरकार आल्यास मोदी आणि शहांना तुरुंगात टाकण्याची भाषा प्रकाश आंबेडकरांनी वापरली असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (BJP State President Chandrashekhar Bawankule) आंबेडकरांचे हे वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये जो असंतोष निर्माण झाला असून त्याचा उद्रेक होईल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिलाय. पुण्यातील एका जाहीरसभेत प्रकाश आंबेडकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.
प्रकाश आंबेडकरांचे ते वक्तव्य विक्षिप्तपणाचे आहे, असे नमूद करताना अशी वक्तव्ये केली जात असतील आम्हाला राज्यभर निषेध करावा लागेल, असे बावनकुळे नागपुरात बोलताना म्हणाले. ही त्यांची मानसिक दिवाळखोरी असल्याचेही ते म्हणाले.
देशाचा मतदार हाच देशाचा मालक आहे. २०२४ मध्ये बिगर भाजपा-आरएसएसचे सरकार येऊ द्या. नरेंद्र मोदी आणि अमित शहांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य आंबेडकर यांनी केले होते. दुर्दैवाने या देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय, असेही ते म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीत जाण्यासाठी धडपड सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीची ठाकरे गटाशी युती झाली असली तरी अद्याप काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांना थारा दिलेला नाही.