नागपूर. पराभवानंतर इंदिरा गांधी (Indira Gandhi ) पुन्हा जोरकसपणे निवडूण आल्या होत्या. आता राहुल गांधी यांना सुद्धा खासदारकीपासून लांब करण्यात आले आहे. ही नरेंद्र मोदी (Narendra Modi ) यांची चूक असून त्यांच्या पतनाची सुरुवात झाली आहे. असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांनी केला. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णया विरोधात आज काँग्रेसकडून देशभर सत्यग्रह आंदोलन करण्यात आले.
नागपुरातही संविधान चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पटोले यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, मोदींच्या हुकुमशाहीमुळे देशाच्या लोकशाहीवर मोठे संकट ओढवले आहे. राहुल गांधी यांनी केलेले विधान निरव मोदी, ललीत मोदी यांच्या संदर्भात होते. चोराला चोर म्हटले. पण, त्याचा चुकीचा अर्थ लावून राहुल गांधींवर कारवाई करण्यात आली आहे. संकुचित मानसिकता विकृतिच्या स्वरूपात पुढे येत आहेत. जनतेचा पैसा शेल कंपन्यांच्या माध्यमातून जिरविणे सुरू आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून हा प्रकार सुरू आहे. याविरोधात राहुल गांधी प्रश्न विचारत आहेत. यासाठीच त्यांनी कन्याकुमारी ते काश्मिर यात्रा काढली. लोकसभेतही 20 हजार कोटी कोणाचे हा प्रश्न उपस्थित केला. प्रश्न विचारत असल्यानेच त्यांना टार्गेट केले गेले. लोकशाहीचा हा विश्वासघात आहे. त्याविरोधात देशभर आंदोलन सुरू असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
संविधान वाचविणे आमचा धर्म
संविधान वाचविणे हा काँग्रेसचा धर्म आहे. त्यासाठी महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गाने लढा सुरू आहे. राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारेची मानसिकताही दिसून येत आहे. त्यांची गर्मी उतरविण्याची ही वेळ आहे. गांधींच्या मार्गाने समविचारी सर्व पक्षांना सोबत घेऊन लढा निकरिस नेणार असल्याचे ते म्हणाले.
बुधवारी भव्य रॅली
लोकशाहीवर आघात करणाऱ्या हुकुमशाही विचारांच्या विरोधात बुधवारी 29 मार्चला व्हेरायटी चौकातील महात्त्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून संविधान चौकापर्यंत भव्य रॅली काढण्यात येणार आहे. हुकुमशाही विरोधातील जनतेत असलेली चिड यानिमित्ताने रस्त्यावर दिसणार असल्याचे पटोले म्हणाले.
आशिष देशमुख पक्षात नाहीत
काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढविणारे आशिष देखमुख यांनी सूरत सत्र न्यायालयाच्या निकालानंतर राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी अशा अशा आशयाची मागणी पत्राद्वारे केली होती. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते आमच्या पक्षात नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. सोबतच नितीन राऊत, सुनिल केदार नसल्याकडे लक्ष वेधले असता ते येऊन गेल्याचे ते म्हणाले.