पेच सुटला..विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी विजय वडेट्टीवारांकडे

0

मुंबई : काँग्रेसमधील विरोधी पक्ष नेतेपदाचा पेच सुटला असून विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी अखेर विजय वडेट्टीवार यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. मागील काही दिवसांपासून या पदासाठी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु होती. अखेर दिल्ली हायकमांडने वडेट्टीवार यांनाच ही जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला असून विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडेच असणार आहे.

दरम्यान, वडेट्टीवार यांचे नाव मविआतील नेत्यांना कळविण्यात आले असून लवकरच विधानसभेच्या अध्यक्षांकडे याबाबतचा प्रस्ताव सादर होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काँग्रेसला विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद मिळण्यावर शिक्कामोर्तब झाले होते. काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्याला विरोधी पक्षनेता करण्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर दुसऱ्या फळीतील विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, सुनील केदार आणि संग्राम थोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. त्यात संग्राम थोपटे यांनी 30 आमदारांच्या समर्थनाचे पत्र दिल्लीमध्ये पाठवले. त्यामुळे आमदारांच समर्थन लक्षात घ्यायचे की आणखी काही निर्णय घ्यायचा हा प्रश्न निर्माण होता. परंतु अखेर वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आणि विरोधी पक्षनेते पद हे विदर्भाकडेच आहे. दरम्यान, विधीमंडळात पावसाळी अधिवेशन संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना विरोधी पक्षनेता ठरलेला आहे. ४ ऑगस्टला अधिवेशनाचे सूप वाजणार आहे.