
महाराष्ट्राची भूमि सुपिक असली, तरी अलीकडे तिला वाळवी लागली आहे, असं दिसते! एक पिक गेलं. दुसरं चोरांनी लुटून नेलं. तिसऱ्या हंगामाच्या आधी पुन्हा भुरटे पळवापळवी करण्याच्या हेतूनं सज्ज झालेले दिसतात!
उभी पिकं रातून कापली जाऊ शकतात. ढापली जाऊ शकतात. खुडूनही नेली जाऊ शकतात. वादळात उडूनही जाऊ शकतात. काळ वाईट आहे. चोर निर्ढावलेले आहेत. सरावलेले आहेत. त्यांची हिम्मतही वाढलेली आहे. हलकटपणा हाच त्यांना पराक्रम वाटायला लागला आहे. आपण बेसावध राहिलो आणि त्यांनी डाव साधला. पुन्हा पुन्हा डाव साधला. नवा हंगाम येण्याआधी ते पुन्हा पळवापळवी करण्याच्या तयारीने सज्ज झालेले आहेत. उकिरड्यावर चरणारी डुकरं गावागावात वाढलेली आहेत.
याचा अर्थ सारा गाव फितूर झाला असा होत नाही, सारं शेत वांझोटं झालं असाही होत नाही. जातिवंत अस्सलपणा असलेलं बियाणं गावागावात अजुनही मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे. ते पारखण्याची गरज आहे. त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. त्याची विश्वासानं पेरणी करण्याची गरज आहे. त्याला मायेची ऊब आणि खतपाणी देण्याची गरज आहे! साऱ्याच ढगातून पाणी येईल असं नसलं, तरी पाणी असलेले नेमके ढग आपल्याला ओळखायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या नव्या विहीरी खोदाव्या लागतील. खोलवर ’बोर’ मारावे लागेल. एका हातानं आकाशातले ढगही थोपवून धरावे लागतील, तर दुसऱ्या हातानं जमिनीच्या गर्भात खोलवर दडून बसलेल्या झऱ्यांशी देखिल दोस्ती करावी लागेल. नवे मैत्रीपूर्ण करार करावे लागतील. आम्हाला स्वतःला आश्वासक वागावं लागेल. प्रामाणिक जगावं लागेल!
अलिकडच्या काळात सत्ताधारी लोकांचे कारनामे पाहिले तर, लोकशाहीचा अर्थ ’शाही पद्धतीनं लोकांची केलेली राजरोस लूट’ असाच होतो. हे लाजिरवाणं आहे, दुदैवी आहे. संतापजनक आहे.
सामान्य माणसाच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण सुरू आहे. नोकऱ्यावर अतिक्रमण सुरू आहे. व्यवसायावर अतिक्रमण सुरू आहे. आपल्या शिक्षणावर, शाळावर अतिक्रमण सुरू आहे. शेती व्यवसायाला त्यांनी सदैव गुलाम म्हणूनच वागणूक दिली. शेतीला त्यांनी कधीच स्वातंत्र्य दिलंच नाही. आता तर असले नसले अधिकारही ताब्यात घेण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत. आमचे सत्ताधारी मुठभर भांडवलदारांचे दलाल झालेले आहेत. आमच्या जमिनीवर कब्जा करायचे प्रयत्न करत आहेत. कधी दलाल लुटत आहेत. कधी विमा कंपन्या लुटत आहेत. तर कधी आणेवारी काढणारे आमचेच लोक लुटत आहेत. आपलं कुणाला म्हणावं आणि परका कोण हेच कळेनासं झालं! आमची अशी दुर्दशा का झाली? आता सत्तेमध्ये तर कुणी परके लोक बसलेले नाहीत! तरीही त्यांनी आमच्याशी असं का वागावं?
याला कारणीभूत आम्ही स्वतः आहोत. हे लोक चुकीचे हे माहित असूनही आम्हीच त्यांना मते देतो. निवडून आल्यावर आम्हीच त्यांचा उदोउदो करतो. त्यांचे सत्कार करतो. त्यांच्या सोबत फोटो काढतो. आमच्या भागातला आमदार किंवा नेता यावा म्हणून मुहूर्त टळून गेला तरी मला मुलींचं लग्न लावत नाही. बायका मुलं उपाशी ताटकळत असतात. काही घेरी येऊन पडतात. पण आम्हाला त्याची चिंता वाटत नाही. आमचा जीव आमच्या नेत्यांसाठी कासाविस होत असतो. नेता चोर असू द्या, डाकू असू द्या. दारूडा असू द्या की बलात्कारी असू द्या. अलिकडे बलात्कारी लोकांना तर मोठ्या सन्मानाने मंत्रिपदे दिली जातात.
खरं तर सभ्य आणि चांगल्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे. त्याच्याकडून दारू, पैसा कशाचीही अपेक्षा न करता स्वेच्छेनं आणि उत्साहानं मतदान केलं पाहिजे. इतर लोक काय करतात, याचा विचार न करता आपण त्याला मतदान केलं पाहिजे. तो निवडून येईल की त्याचं डिपॉझित जप्त होईल याची चिंता न बाळगता आपण त्याच्या बाजून उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरूवात स्वतःपासून केली पाहिजे.
सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला आता रक्त लागलेलं आहे. सत्तेची चटक लागली आहे. अनेक वर्षे जनता उदासिन राहिली. बेजबाबदारपणे मतदान करत राहिली. जणू हा देश आपला नाहीच, या तऱ्हेनं मतदान करत राहिली. लोकशाहीचा अर्थ आणि मतदानाची किंमत आम्हाला खऱ्या अर्थानं समजलीच नाही. म्हणून तेच ते लोक पुन्हा पुन्हा निवडून येताना दिसतात. त्यांच्यानंतर त्यांची पुढची पिढी तयारच असते. काही झालं तरी सत्ता सोडवत नाही. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी भ्रष्टाचार आणि मिळालेली सत्ता टिकवण्यासाठी डबल भ्रष्टाचार, असं सत्तेचं नवं समिकरण रूढ झालेलं आहे. त्यामुळे निर्लज्जपणानं केलेलं पक्षांतर आता नियमित गोष्ट झाली आहे. त्याचं कुणाला काहीही वाटत नाही.
पण आजवर झालं ते झालं. चुका प्रत्येकाच्याच होतात. आपल्याही झाल्यात. त्याची फळं आपण भोगत आहोत. नको एवढी किंमत मोजत आहोत. आता या दुष्टचक्रातून आपल्याला बाहेर यावं लागेल. अन्यथा हा देश आपला राहणार नाही. त्यासाठी स्वतःच आपण खंबीर झालं पाहिजे. विकृतीच्या विरोधात लढण्यासाठी समोर आलं पाहिजे. देशासाठी आणि आपल्या पुढील पिढ्या बर्बाद होऊ नयेत म्हणून वेळप्रसंगी बलिदान देखिल करायला तयार असलं पाहिजे.
हंगाम येतील, हंगाम जातील. माणसं येतील माणसं जातील. काही बिया सडतील. काही रोपं सडतील. काही झाडंही सडतिल. काही फळं गळतील. गळू द्या. आपण आपली पेरणी आणि बागेची मशागत अखंड सुरू ठेवली पाहिजे. आणि त्यासाठी नवे नवे तंत्र उपयोगात आणले पाहिजे.
पिकावर आलेली टोळधाड मोठी आहे. संघटित आहे. सारा मीडिया त्यांच्या बाजूनं आहे. सारा माल त्यांच्या तिजोऱ्यात बंद करून ठेवला आहे. जात धर्माच्या नावावर आपले मेंदुही हायजॅक केलेले आहेत. ह्या दुष्टचक्रातून बाहेर पडलं पाहिजे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांचा भारत राष्ट्र समिती (BRS) हा पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात उतरला आहे. देशभरात अत्यंत नियोजनपूर्वक बांधणी करत आहे. भारताच्या विविध राज्यातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नुकतेच ओरीसाचे भूतपूर्व मुख्यमंत्री गिरिधर गोमांग आणि त्यांच्या सोबत दोन डझन माजी आमदार, खासदार आणि प्रदेश पातळीवरील अनेक नेत्यांनी हैद्राबाद येथे BRS मध्ये प्रवेश घेतलेला आहे. महाराष्ट्रात काही माजी खासदार, आमदार त्यांच्या संपर्कात आहेत. पाठिंबा वाढतो आहे. ५ फेब्रुवारी २३ला महाराष्ट्रात पक्ष प्रवेशाचा सोहळा आणि जाहीर सभा आयोजित केलेली आहे. या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकरणात एक नवे वादळ येऊ घेतलेलं आहे. ’केसीआर’ यांनी शेतकरी अजेंडा देशपातळीवर नेण्याचं महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक काम केलेलं आहे, यात संशय नाही. मोजक्या शब्दात बोलायचं झालं तर..
कोवळ्या चोचित मजला गोड गाणी पाहिजे
कोरड्या शेतास माझ्या विज – पाणी पाहिजे
भीक नव्हती, हक्क होता, पण तुम्ही नाकारला
आज मजला, देश – दिल्ली – राजधानी पाहिजे!
हा भारतीय शेतकऱ्यांचा अजेंडा असला पाहिजे. हाच ’केसीआर’ यांचा अजेंडा आहे. ध्यास आहे. निर्धार आहे. महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे!
तूर्तास एवढंच !
–
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष, लोकजागर