कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान वाहतूक मार्गात बदल

0

नागपूर, दि. 08 : जिल्हयातील जामठा क्रिकेट स्टेडियमवर 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी जड वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
उभय संघादरम्यानचा हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या वाहनाने जामठाकडे येतात. त्यामुळे वर्धा रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन अपघातप्रवण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जड वाहतूक करणारी वाहने या गर्दीत अडकून त्यांची देखील गैरसोय होणार आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्याकरीता जड वाहनांना नऊ ते 13 फेब्रुवारीदरम्यान वर्धा रोड कडून नागपूर आऊटर रिंगरोड कडे येणारी जड वाहतुकीला क्रिकेट सामना सुरू होण्यापुर्वी तसेच सामना संपेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
हैद्राबाद, वर्धा मार्गाने नागपूर शहराकडे येणारी जड वाहतूक डोंगरगाव टोल नाका येथे थांबविण्यात येणार आहे. कामठी, भंडारा आऊटर रिंग रोडने वर्धा रोडकडे जाणारी वाहतूक पांजरी टोल नाक्याजवळ, अमरावती रोडकडुन वर्धा रोड कडे जाणारी वाहतूक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट फाट्याजवळ थांबविण्यात येणार आहे. ही वाहतूक फक्त सामना चालु होण्याअगोदर व नंतरच थांबविण्यात येणार आहे. इतर वेळेस वाहतूक सुरळीत सुरू राहील, असे वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांनी कळविले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा