“ईडीचे आभार माना, ईडीनं तुम्हाला एकत्र आणलं…” पंतप्रधानांचा विरोधकांना टोला

0

नवी दिल्लीः अदानी प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट लक्ष्य करणारे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा मोदी यांनी संसदेतील भाषणात (PM Narendra Modi in Parliament) समाचार घेतला. “प्रत्येकाने आपआपले आकडे मांडले, अर्थ मांडले आणि आपली रुची, प्रवृत्ती आणि प्रकृतीनुसार सर्वांनी आपलं म्हणणं मांडलं. त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकल्यानंतर हे लक्षात येतं की कोणाची किती क्षमता आहे, किती समज आहे, कुणाचा काय इरादा आहे हे सर्व समजतं,” या शब्दात मोदी यांनी राहुल गांधी यांना उत्तर दिले व ‘ये केह कहकर हम, दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है..” असा टोलाही लगावला. “आज विरोधक एकत्र आले. मिले-तेरा मेरा सूर, अशी परिस्थिती विरोधकांची आहे. पण या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे कारण ईडीनेच या लोकांना एका समान व्यासपीठावर आणले आहे. देशातील निवडणुकांचे निकाल जे करू शकले नाहीत, ते ईडीने केले” असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावरील आपल्या भाषणात मोदी यांनी राजकीय टिकाटिप्पणीचाही समाचार घेतला. उद्योजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय नाते आहे, असा थेट प्रश्न करत राहुल गांधी यांनी मंगळवारी संसदेत हल्लाबोल केला होता. मोदी-अदानी यांच्यामध्ये साटेलोटे असून दोघेही एकमेकांना फायदा करून देतात. अदानींनी २० वर्षांमध्ये मोदींना व भाजपला किती पैसे दिले, असा प्रश्न गांधी यांनी विचारला. मोदी पंतप्रधान झाल्यावर हे नाते राष्ट्रीय झाले, आता तर ते आंतरराष्ट्रीय झाले आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्यावर खालच्या स्तरावर टीका करणाऱ्या नेत्यांचा मोदींनी समाचार घेतला. “या सदस्यांच्या मनात जो द्वेष होता, तो टीव्हीवरच सर्व देशाला दिसला” असा उल्लेख त्यांनी केला. टूजी आणि कॉमनवेल्थ घोटाळ्यावरुन त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. २००४ ते २०१४ हे दशक अत्यंत वाईट दशक होते. प्रत्येक संधीला संकटात नेणारा तो काळ होता. टेक्नॉलॉजी वाढत होती तेव्हा हे टूजी मध्ये अडकून गेले. सिव्हिल न्यूक्लिअर डील झाली तेव्हा हे घोटाळ्यात अडकले. २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाले. भारताचं नाव या घोटाळ्यांमुळे बदनाम झाले व जगात भारताची अब्रू गेली, असा उल्लेख मोदींनी केला.
मागील शतकात जम्मू काश्मीरमध्ये हिंसाचाराचा प्रभाव होता. श्रीनगरच्या लालचौकात तिरंगा फडकवण्याइतपत परिस्थिती नव्हती. तरीही आम्ही दहशतवाद्यांना आव्हान देत तिरंगा फडकावला होता. आता जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाचा नायनाट झाला आहे व मुक्तपणे तिरंगा फडकावता येतो, असा टोला मोदी यांनी राहुल गांधी यांना लगावला.