
-.खा. शरद पवार करणार मार्गदर्शन
नागपूर : सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींचा राज्यस्तरीय मेळावा १२ फेब्रुवारी रोजी गांधी आश्रम, सेवाग्राम, वर्धा येथे सकाळी १० ते दुपारी ४ या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान विदर्भातील सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभा महासंघ व संस्था प्रतिनिधींची सभा देखील गांधी आश्रम, सेवाग्राम, वर्धा येथे आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून जेष्ठ नेते खा. शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सामुहिक वनहक्क व उपजीविका या विषयासंदर्भात राज्य व देश पातळीवर कार्यरत असलेले जेष्ठ व अनुभवी दिलीप गोडे, श्रीमती प्रतिभा शिंदे, ऍड. पूर्णिमा उपाध्याय, डॉ. किशोर मोघे देखील प्रामुख्याने उपस्थित राहतील. मेळाव्यात विदर्भ, खानदेश, कोकण या विभागातील ग्रामसभा प्रतिनिधींचा सहभाग असून ७००-८०० प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात वनहक्क कायदा ,२००६ व नियम २००८ द्वारा जवळपास ७००० गावांना ३० लाख एकर वन जमिनीवर व जल स्त्रोतांवर सामुहिक हक्क प्रदान करण्यात आले आहेत. १३-१४ लाख कुटुंब व ६०-७० लाख नागरिकांना वनांवर स्वामित्व हक्क मिळाले आहेत. यांतील बहुसंख्य नागरिक आदिवासी व गरीब वन निवासी आहेत व त्यांची उपजिविका शेती आणि जंगलातील वनउपज (तेंदु पत्ता,बांबु,मोहा फुले, आवळा,हिरडा/ बेहडा व इतर) यावर अवलंबून आहे. जल, जंगल व जमिन याचे एकत्रित व सामुहिक व्यवस्थापन केले तर मोठ्या प्रमाणात या गावातील नागरिकांना आर्थिक लाभ होईल व रोजगार निर्माण होईल.
सामूहिक वनहक्क परिषदेमध्ये ग्रामसभांचे वन व जलसंधारण, उपजिविका, वनउपज व शेती यात झालेली विकास कामे, शासकीय योजनांचे अभिसरण, सामुहिक वनहक्क व उपजिविका, ग्रामसभांचे महासंघ व शासनासोबत सुसंवाद, यावर कार्य करतांना आलेल्या अडचणी व करावयाची उपाययोजना यावर चर्चा करून निर्णय घेतले जातील. मेळाव्यात चर्चासत्रादरम्यान वनहक्क, वन व जल संधारण या विषयांवर उत्तम कामे झालेल्या गावांचे प्रतिनिधी आपले मनोगत व्यक्त करतील.