जि.प.मध्ये तृणधान्य विषयावर कार्यशाळा
नागपूर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. तृणधान्याच्या आहारात समावेश करुन आरोग्य सुदृढ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देशभरात जणजागृती करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमिवर जिल्हा परिषदेमध्ये या विषयावर कार्यशाळेचेही आयोजन (Workshop on Millets) करण्यात आले. यामध्ये कृषी विभागाच्या अधिकाºयांना तृणधान्य लागवड व प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले. तर लवकरच महिला बचत गटांना पौष्टिक तृणधान्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचे कृषि महाविद्यालयातील अधिकाºयांनी स्पष्ट केले.
जि.प.च्या कै.आबासाहेब खेडकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी सीईओ सौम्या शर्मा होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, महिला व बाल कल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ भागवत तांबे, प्राथमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार, कृषि विकास अधिकारी प्रवीण देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी कृषि महाविद्यालयाचे कृषि विद्यावेत्ता विनोद खडसे यांनी कार्यशाळेला उपस्थित कृषि विभागाच्या तालुकास्तरावरील अधिकाºयांना तृणधान्य लागवड व प्रक्रियेबाबत प्रशिक्षण दिले. सोबतच लवकरच महिला बचत गटांनाही पौष्टिक तृणधान्यापासून विविध प्रक्रिया पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी डागा स्त्री रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञांनी उपस्थितांना तृणधान्याचे महत्त्व पटवून दिले. यावेळी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी ज्वारी व बाजरी या तृणधान्याचे आहारात समावेश करण्यासाठी नि:शुल्क पाकीटांचे वितरण करण्यात आले. संचालन शेकर यांनी केले. तर प्रवीण देशमुख यांनी आभार व्यक्त केले. कार्यशाळेला तालुकास्तरावरील कृषि विभागातील अधिकारी, कर्मचाºयांसोबतच शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आणि महिला बचत गटांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.