मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धाटन केलेली विकास कामे महाविकास आघाडीच्या काळातील असल्याचा दावा शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State BJP President Chandrashekhar Bawankule) यांनी उत्तर दिले असून “विकासकामे ही उद्धव ठाकरेंच्या रक्तातच नाहीत. ते फक्त सोन्याचा चमच्याने ज्यूस पिऊन मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या विषयावर बोलू नये” असा टोला त्यांनी ठाकरे यांना लगावला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या काळात जनतेसाठी काहीच कामे केली नाहीत. आमदाराच्या पत्रांवर देखील ते सही करत नव्हते तर ते विकास कामे कशी काय करू शकतात? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.
बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे विकासाचं बोलतात तेव्हा या गोष्टीचे वाईट वाटते. त्यांनी कधीच मातोश्रीच्या बाहेर पाऊल ठेवले नाही. त्यांनी जो विकास केला तो केवळ कंत्राटदारांना पोसण्याचा. मी आजवर अनेक सरकार पाहिलेली आहेत. पण उद्धव ठाकरे हे आमदारांच्या कोणत्याच पत्रावर सही न करणारे एकमेव मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या खिशात कधीच पेन नसायचा. त्यामुळे त्यांनी विकास कामांवर बोलू नये, असे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, आता सरकारचे बहुमत सिद्ध करायचे झाल्यास १८४ आमदार भरतील, असा दावाही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना केला. विरोधी पक्षातील अनेक आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छूक आहेत, असे ते म्हणाले